मुंबई । आयआयटीयन्सचं डॉलर्स कमवण्याचे स्वप्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अक्षरश: धुळीला मिळालं आहे. ज्या आयआयटीयन्सना अमेरिकेच्या बड्या पगाराच्या नोकर्यांची ऑफर मिळाली होती, त्यांना अद्यापही व्हिसा धोरणामुळे ती ऑफर स्वीकारता आलेली नाही. अनेकांनी तुलनेने कमी पगाराच्या नोकर्या स्वीकारून समाधान मानलं आहे.
व्हिसा मिळणेच केले कठीण
अनेक शैक्षणिक संस्थांची चिंताही यामुळे वाढली आहे. पुढील प्लेसमेंट सीझनमध्ये अमेरिकेच्या ऑफर्स घटण्याची शक्यता आहे. विद्यार्थीदेखील आता अमेरिकेऐवजी जपान, तैवान, कॅनडा, सिंगापूर आणि युरोपीय देशांकडे आपल्या करिअरसाठी पाहात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर व्हिसा धोरणात बदल केले. परिणामी क-1इ व्हिसा मिळणे तरुणांसाठी खूपच कठीण होऊन बसले आहे. यामुळे परदेशात जावून बक्कळ पैसा कमविण्यचे भारतीयांचे स्वप्न भंगले आहे.
अन्य देशाचा निवडला पर्याय
गेल्यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकी कंपन्यांच्या जॉब ऑफर्स मिळाल्या, त्यांच्यापैकी खूप कमी जणांनी काम सुरू केलं आहे. काहींनी कंपन्यांचं भारतातलं ऑफिस जॉइन केलं आहे. काही कंपन्यांनी आपल्या अन्य देशातल्या कंपन्यांमधल्या जॉबचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. परिणामी अमेरिकेऐवजी इतर देशात जाण्याशिवाय भारतीय तरुणांना पर्याय उलेला नाही.