नवी दिल्ली । देशात खेळाच्या क्षेत्रात वाढते डोपिंगचे प्रमाण लक्षात घेत केंद्र सरकारने कठोर पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजेन्सीद्वारा (नाडा) गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डोपिंगप्रती कुठलीही दयामाया दाखवायची नाही, असे केंद्र सरकारने ठरविले आहे. यावेळी डोपिंगला गुन्हा ठरविण्यासंदर्भात विचार होणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली.
डोपिंगप्रती कडक धोरण अवलंबणार
फुटबॉल गोलकिपर सुब्रत पाल प्रतिबंधित पदार्थ सेवनात पॉझिटिव्ह आढळताच भारतीय फुटबॉल विश्वाला हादरा बसला. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी हे संकेत दिले. सुब्रतचा ‘ब’ नमुना अद्याप यायचा आहे. नाडा, भारतीय ऑलिम्पिक संघटना, राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाने डोपिंगप्रती कडक धोरण अवलंबण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या आहे. चर्चासत्रात डोपिंगविरुद्ध काय धोरण अवलंबायचे यावर मंथन झाले. जाहिरातींच्या माध्यमातून डोपिंगचे दुष्परिणाम युवा पिढीला समजावून सांगण्याच्या सूचना मंत्र्यांनी नाडाला दिल्या आहेत. गोयल यांनी सरकारतर्फे फूड सप्लिमेंटचे परीक्षण करण्याविषयी पद्धत काय असावी यावर विचार सुरू असून जे खेळाडू सप्लिमेंट घेतात त्यांनी प्रतिबंधित औषध सेवनापासून दूर रहावे, असे आवाहन क्रीडापटूंना करण्यात आले आहे.