लंडन । विश्वविक्रमी जमैकाचा धावपटू यूसेन बोल्टने नेहमीच डोपिंगला कडाडून विरोध केला आहे. डोपिंग कायम राहिल्यास ट्रॅक आणि मैदानी खेळांचा शेवट होईल असा गंभीर इशारा ऑलिम्पिक विजेत्या बोल्टने आपल्या सहकारी धावपटूंना दिला आहे. लंडनमध्ये होणारी जागतिक स्पर्धा बोल्टची शेवटची स्पर्धा असणार आहे. लंडनमध्ये बोल्ट 100 मीटर आणि चार बाय 100 मीटर रिले शर्यतीत सहभागी होणार आहे.
गेल्यावर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकांची तिसरी हॅट्ट्रिक साधल्यावर ऑलिम्पिक स्पर्धांना अलविदा केले होते. शेवटच्या शर्यतीआधी डोपिंगवरून बोल्टने अनेक प्रश्न उपस्थित केले. रशियामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या डोपिंगचा उलगडा झाल्याचा उल्लेख करत बोल्ट म्हणाला की, या खेळात यापेक्शा आणखी काही वाईट घडू शकत नाही. डोपिंगच्या या प्रकरणांमुळे मैदानी खेळांची मोठी हानी झाली आहे. आपण काय करतोय हे त्या खेळाडूंना समजले असेलच. डोपिंग थांबले नाही तर मैदानी खेळांचा शेवट होईल. याबाबतीत लवकरच उपाय योजना केली जाईल. काही वर्षांमध्ये डोपिंग रोखण्यास पावले उचलण्यात आली आहेत.