‘डोपिंग टेस्ट’ला बीसीसीआयचा नकार

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी करुन देण्याची राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेची मागणी बीसीसीआयने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट घेणे हे कुठल्याही सरकारी संस्थेच्या कार्यक्शेत्रात येत नसल्याचे बीसीसीआये नाडाला कळवले आहे. विशेष म्हणजे क्रिकेट प्रशासकिय समितीने केलेल्या सूचनेनंतर बीसीसीआयने आपली भुमिका नाडाला कळवली आहे. नाडाने केलेल्या मागणीला विरोध करताना बीसीसीआयने स्पष्ट केले की, बीसीसीआय राष्ट्रीय क्रीडा महासंघाला संलग्न नाही त्यामुळे नाडासारख्या सरकारी संस्थेला भारतीय क्रिकेटपटूंची डोपींग टेस्ट करण्याचा अधिकार नाही. बीसीसीआयची स्वत:ची डोपिंगविरोधी यंत्रणा त्याकरता भक्कम आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी म्हणाले की, बीसीसीआयचा राष्ट्रीय क्रीडा महासंघाशी कुठलाही संबध नाही.

नाडाप्रमुख, क्रीडा सचिवांना पत्र
केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांनी बीसीसीआयला ऑक्टोबर महिन्यात पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी नाडाला सहकार्य करण्याची बीसीसीआयला सूचना केली होती. त्याशिवाय नाडाला सहकार्य न केल्यास बीसीसीआयवर आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेच्या (वाडा) नियमांचे पालन न केल्याचा आरोप होईल असे स्पष्ट केले होते. यासंदर्भात बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी क्रीडा सचिव आणि नाडाचे प्रमुख नवीन अगरवाल यांना पत्र लिहीले आहे. बीसीसीआयची डोपिंग विरोधी यंत्रणा मजबूत आहे. त्यात सामन्याच्या दरम्यान आणि नंतर क्रीडा मंत्रालयाच्या नियमांनुसार वाडाची मान्यता असलेल्या प्रयोगशाळेमार्फत तपासणी केली जाते.

बीसीसीआय आयोजित करत असलेल्या स्पर्धांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट नाडाला करण्याचा अधिकार नाही. वाडाची मान्यता असलेल्या स्विडनच्या आंतरराष्ट्रीय उत्तेजकद्रव्य तपासणी संस्थेमार्फत ( आयडीटीएम) बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी करत असते. यापुढेही याच संस्थेबरोबर संलग्न राहण्याची शक्यता असल्याचे बीसीसीआयच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले.