डोलारखेडा वनपरीक्षेत्रात चितळ हरणांची 22 शिंगे आढळली

0

हरणांची शिकार झाल्याचा संशय ; वनविभागाची गस्त ठरतेय तोडकी

मुक्ताईनगर- तालुक्यातील कुर्‍हा-वढोदा वनपरीरक्षेत्रातील डोलारखेडा गावाकडील वन परीक्षेत्रात चितळ हरणाच्या प्रजातीची लहान-मोठे 22 शिंगे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या भागात शिकार्‍यांचा डेरा असल्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीच पाच शिकार्‍यांना अटक करण्यात आल्यानंतर या बाबीला पुष्टी मिळाली आहे तर वन्यजीवांचा अधिवास असलेल्या या क्षेत्रात वनविभागाची गस्त तोडकी ठरत असल्यानेच शिकार्‍यांचे फावत असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे.

शिंगाची तस्करीची शक्यता
चितळ हरणाच्या शिंगांना मोठी मागणी असल्याने शिकार्‍यांनी ही शिंगे वढोदा वनपरीक्षेत्रातील डोलारखेडा गावाजवळील वनपरीक्षेत्रात लपवली होती तर शिंगांची तस्करी होणार माहिती फॉरेस्ट विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्यावरून फिरस्ती पथक तसेच स्थानिक वढोदा परीक्षेत्रातील पथकाने 21 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही शिंगे जप्त करीत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई वनक्षेत्रपाल गस्तीपथक जळगाव धनंजय पवार, वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण आदींच्या पथकाने केली.