डोळे फोडणार्‍या मुलाविरूद्ध फिर्याद देण्यास मातेचा नकार

0

डोळ्यांत चाकू खुपसून मनोरुग्ण मुलगा झाला आहे फरार
आईवर वायसीएम रुग्णालयात सुरू आहेत उपचार

पिंपरी-चिंचवड : स्वतःच्या आईच्या डोळ्यात मनोरुग्ण मुलाने चाकू खुपसून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. मात्र, मातृप्रेमाने आधीच आंधळ्या झालेल्या मातेने मुलाविरूद्ध फिर्याद देण्यास नकार दिला आहे. सुमन सावंत (वय 75) असे जखमी आईचे नाव आहे. तर भूपेंद्र सावंत (वय 35) असे मुलाचे नाव आहे. भूपेंद्र या प्रकारानंतर घरातून निघून गेला आहे.

पोटच्या गोळ्यावर प्रेम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यांचे पती मुंबईला कामानिमित्त असतात. भूपेंद्र हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. मागील काही दिवसांपूर्वी भूपेंद्रला घरी आणले होते. घरी आणल्यानंतर तो बराच काळ घराबाहेर घालवत असे. शनिवारी सुमन घरी एकट्याच होत्या. दुपारच्या वेळी भूपेंद्रने चाकू घेऊन आईच्या दोन्ही डोळ्यात खुपसला यामध्ये सुमन त्यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली. दरम्यान, भूपेंद्रने घरातून धूम ठोकली. शेजार्‍यांना घटनेची माहिती होताच सुमन यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटच्या मनोरुग्ण मुलाकडून ही चूक झाली असल्याने सुमन यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला आहे.