डोवाल-जन्जुआ गुपचूप भेटले!

0

इस्लामाबाद : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल व पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेप्टनंट जनरल (नि.) नसीर खान जन्जुआ यांची 26 डिसेंबररोजी बँकॉक येथे अत्यंत गोपनीय भेट झाल्याचे वृत्त भारतीय प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने पाकिस्तानातील जिओ या वृत्तवाहिनीने दिले आहे. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीत त्यांच्या आई व पत्नीस मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवरून सद्या दोन्ही देशांत तणाव निर्माण झालेला असताना ही गोपनीय भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या गोपनीय भेटीचा तपशील हाती आला नसला तरी, एका अज्ञातस्थळी ही भेट झाल्याची माहिती देण्यात आली.

यापूर्वीच्या सिक्रेट मिटिंगनंतर मोदींची लाहोर सरप्राईझ व्हिजिट!
या वृत्तानुसार, डोवाल व जन्जुआ यांची बँकॉक येथील भेट ही पूर्वनियोजित होती. इतर राष्ट्रांच्या गुप्तचरांनादेखील या भेटीचा सुगावा लागू नये, याची काळजी पाकिस्तान व भारत या दोन्ही राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांसह गुप्तचर यंत्रणांनी घेतली होती. या भेटीची भारत किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकार्‍याने वाच्यता केली नाही. यापूर्वी हे दोन्हीही एनएसए डिसेंबर 2015 मध्येच बँकॉक येथे भेटले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लाहोर भेट देत, पाकिस्तान व भारतीयांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. या भेटीत मोदींनी नवाझ शरीफ यांच्या नातीच्या लग्नाला हजेरी लावली होती, तसेच तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. आतादेखील 26 डिसेंबरची डोवाल यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर जन्जुआ यांनी 28 डिसेंबररोजी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन तब्बल पाच तास गोपनीय चर्चा केली होती. शरीफ यांच्या इस्लामाबादस्थित जाटी उमरा या हवेलीत ही बैठक झाल्याचे वृत्तही जिओ टीव्हीने दिले आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षाविषयक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तसेच, भारताची सुरक्षाविषयक भूमिकाही शरीफ यांना सांगण्यात आल्याचे कळते.

अमेरिका भारताच्या तालावर नाचते : पाकची टीका
अलीकडेच 18 डिसेंबररोजी इस्लामाबाद येथे झालेल्या सेमिनारमध्ये जन्जुआ यांनी सांगितले होते, की अमेरिका भारताच्या इशार्‍यावर नाचत असून, काश्मीरप्रश्‍नी भारताच्या भूमिकेलाच पाठिंबा देत आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या नव्याने पुनर्बांधणीतही अमेरिकेने भारतालाच महत्वपूर्ण भूमिका दिली असून, इस्लामाबादपेक्षा त्यांना नवी दिल्ली जवळची वाटते, अशी टीकाही त्यांनी अमेरिकेवर केली होती. दरम्यान, 26 डिसेंबरच्या बैठकीत प्रामुख्याने 2017मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) वाढलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना आणि काश्मीरमधील हिंसाचार यावर चर्चा झाली असावी, अशी शक्यता पाकच्या लष्करी सूत्राने व्यक्त केली आहे. या शस्त्रसंधीत भारताच्या हल्ल्यात 52 पाकिस्तानी नागरीक ठार झालेले असून, 254 नागरिक जखमी झालेले आहेत. तसेच, शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 1813 घटना उघडकीस आल्या आहेत, असेही लष्करी सूत्र म्हणाले.