ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हनंतर थरार ; तीन दुकानांचे नुकसान

0

भुसावळात जामनेर रोडवर तरुणांनी लावली शर्यत ; वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चौघे तरुण जखमी

भुसावळ (प्रतिनिधी)- हॉटेलमध्ये पार्टीचा बेत केल्यानंतर रस्ता सुमसान असल्याचे पाहत धूम स्टाईल रेस लावण्यात आली मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ थेट दुकानाला धडकल्याने तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले तर वाहन रस्त्यावरच उलटल्याने चौघे तरुण जखमी झाल्याची घटना शहरातील जामनेर रोडवरील साई डेअरीजवळ गुरुवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील तरुणांनी मद्यपान केल्याचा आरोप घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरीकांनी केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करणत आला तर हातावर पोट भरणार्‍या व्यावसायीकांच्या दुकानांचे नुकसान झाल्याने त्यांनी मदतीची मागणी केली आहे. भुसावळात यापूर्वीही अनेकदा तरुणांकडून निर्जन ठिकाणी स्टंटबाजी करण्याचे प्रकार सुरू होते तर गुरुवारच्या या घटनेने या बाबीला दुजोरा मिळाला आहे.

तीन दुकानांचे प्रचंड नुकसान
रेसच्या नादात स्कॉर्पिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट फुथपाथवर चढून बाजूला असलेल्या प्रभाकर मोतीराम जावळे यांच्या सौरभ पान सेंटरसह विलास काशीनाथ जाधव यांच्या चिकन दुकान व रमेश पूनमचंद कोठारी यांच्या ढेप दुकानावर व शरद देवरे यांच्या फर्निचर दुकानावर आदळून रस्त्यावर उलटली. या अपघातात चारचाकी वाहनाचा पार चेंदामेंदा होवून रस्त्यावरच ऑईल सांडले जावून काचादेखील विखुरल्या होत्या. या अपघातानंतर विलास जाधव, प्रकाश पाटील, दत्तू सपकाळे, पिंटू ढाके (कृष्णा नगर) आदींनी जखमींना शहरातील सोनिच्छावाडी दवाखान्यात हलवले व तेथून जखमीस गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेत पोलीस डायरीत तशी नोंद केली.

51 हजारांची शर्यत बेतली असती जीवावर !
बुधवारी रात्री एका हॉटेलात पार्टी करून दोन वाहनातील सहा तरुणांनी नाहाटा चौफुली गाठली. उभयंतांनी यावेळी दोन वाहनांमध्ये 51 हजारांची रेस लावल्याचे समजते. दोन्ही वाहने भरधाव दिशेने शहराकडे येत असताना पांढर्‍या रंगाची स्कार्पिओ गाडी साई डेअरीजवळ (एम.एच.05 सी.एच. 9001) ही गाडी थेट फूटपाथवर चढून तीन दुकानांना धडक देत रस्त्यावरच उलटली तर या वाहनासोबत रेस लावलेली स्वीप्ट डिझायर मात्र घटनास्थळावरून गायब झाल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त स्कार्पिओ गौरव अनिल मनवाणी चालवत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली. या अपघातात गौरव गोपीचंद लुल्ला, , निखिल रत्नानी (तिन्ही रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) तसेच समीर रायचंद राणे (दादर, मुंबई) हे देखील किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

मोटार अपघाताची नोंद
रात्री झालेल्या अपघाताची येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोटर अपघाताची नोंद करण्यात आली. पोलिसांनी सुध्दा घटनास्थळाला भेट देत तेथील परिस्थितीचे फोटो काढलेत. बाजारपेठ पोलिस ठाण्यात जामनेर रोडवरील रीक्षा चालक विलास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटर अपघाताची नोंद करण्यात आली. हवालदार सय्यद अली तपास करीत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.