ड्रग्ज पिण्याच्या नादात सोळा बाईक पेटविल्या

0

मुंबई- ड्रग्जच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चिलीम पिण्यासाठी माचिसची कांडी पेटवून ती कांडी बाईकच्या दिशेने फेंकून दिल्याने एक, दोन नव्हे तर बाईकला आग लागली. या आगीत सोळा बाईक पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत. ड्रग्ज पिण्याच्या नादात सोळा बाईक पेटविणार्‍या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला नंतर सांताक्रुज पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खाजगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांनी दुजोरा दिला आहे.

मात्र अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. दानिश हा सोळा वर्षांचा मुलगा वांद्रे येथे राहत असून तो ड्रग्जच्या पूर्णपणे आहारी केला आहे. लहानसहान चोर्‍यामार्‍या करुन तो ड्रग्जचे सेवन करीत होता. 16 मार्चला तो वांद्रे येथून जुहू चौपाटी येथे फिरण्यासाठी आला होता. काही वेळ फेरफटका मारल्यानंतर तो तो तेथीलच एका गल्लीत ड्रग्जच्या सेवन करण्यासाठी बसला होता. यावेळी चिलीम पेटविताना त्याने माचिसची कांडी बाजूला पार्क केलेल्या एका बाईकच्या दिशेने फेंकून दिली होती. या बाईकच्या खाली ऑईल असल्याने बाईकने अचानक पेट घेतला. काही वेळाने बाजूला असलेल्या इतर बाईकने पेट घेतल्याने तिथे मोठी आग लागली होती. आग लागताच दानिश हा प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या जवानांनी काही तासांत ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत सोळा बाईक पूर्णपणे भस्मसात झाल्या होत्या. सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर सांताक्रुज पोलिसांनी पळून गेलेल्या मुलाविरुद्ध विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने बाईकला आग लावली नव्हती. मात्र चिलीम पिण्यासाठी पेटती कांडी बाईकच्या दिशेने फेंकून दिल्याने सुरुवातीला एका बाईकला आग लागली आणि काही वेळात तिथे पार्क केलेल्या इतर पंधरा बाईकने पेट घेतली होती. या आगीच्या घटनेने तो प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला होता. सोळा वर्षांचा असल्याने दानिशला नंतर डोंगरीतील बालन्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंतनू पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान आगीच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.