बारामती । बारामती शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हे खड्डे मृत्यूला निमंत्रण देत आहेत. हे कमी की काय म्हणून बारामती नगरपालिकेने ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. भिगवण चौक ते विद्याप्रतिष्ठान या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर 15 हजारच्यावर खड्डे खणले आहेत. नगरपालिकेने सर्व रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती यांच्यामार्फत केली आहेत. ही कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाच टक्के कमीशन दिले जाते. या सगळया व्यवहारात रस्त्याच्या कामावर नगरपालिकेचे नियंत्रण नसल्यासारखीच परिस्थिती आहे.
10 कि. मी. च्या परिसरात 40 हजार खड्डे
अवघ्या एक वर्षापूर्वी सर्व्हिस रोड तयार झाला. हा रस्ता जैन मंदिर ते पेन्सिल चौक असा 4 किलोमीटरचा आहे. या रस्त्यावर पहिल्याच पावसाळ्यात मोठाले खड्डे पडले आहेत. तर डाव्या बाजूला पाच सहा महिन्यांपूर्वी नऊ ते दहा मोठाले खड्डे आहेत. बारामतीच्या दहा किलोमीटरच्या परिघात 40 हजार खड्डे असतील. यातील काही रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील आहेत. या रस्त्याला कुणीही वाली नसल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांचे हाल
नगरपालिकेने आपली जबाबदारी झटकून रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली आहेत. मात्र कामाच्या दर्जाविषयी सार्वजनिक बांधकाम खाते व नगरपालिका एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. खड्डे बुजविण्याची तसदी देखिल घेतली जात नाही. वास्तविक पाहता या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्यसरकारने दिलेला आहे. परंतु या निधीचा योग्यप्रकारे उपयोग करण्यात येत नसल्याचे दिसून येते.
मोठ्या दुर्घटनेची शक्यता
ऐन पावसाळ्यात नगरपालिकेने डे्रनेज दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. सुदैवाने पावसाने विश्रांती घेतली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास मोठ्या दुर्घटनेला तोंड द्यावे लागेल, अशी परिस्थिती आहे. ड्रेनेजची कामे काढताना नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने लोकांची गैरसोय कशी टाळता येईल, याची कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.