ड्रेनेज साफसफाईकरिता ठेकेदाराला दोन कोटी

0

अ, इ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील नलिका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ आणि इ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील जलनि:सारण नलिकांची ठेकेदारी पद्धतीने साफसफाई आणि ड्रेनेज चोकअप काढण्यात येते. एक वर्षे कालावधीसाठी हे काम करण्यासाठी ठेकेदाराला दहा टक्के दरवाढ देऊन दोन कोटी 32 लाख रूपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जलनि:सारण नलीकांची ठेकेदारी पद्धतीने साफसफाई आणि ड्रेनेज चोकअप काढण्याचे काम आर्यन पंप्स अ‍ॅण्ड एन्व्हायरो सोल्युशन्स या ठेकेदारामार्फत केले जात आहे. या निविदेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. सुरूवातीस कामाचा आदेश एक वर्षासाठी आहे. त्यानंतर कामाची प्रगती विचारात घेऊन पुढील प्रत्येक वर्षासाठी स्थायी समितीच्या मान्यतेने मुदतवाढ देण्यात येते. त्यानुसार, या निविदेस स्थायी समितीने 8 डिसेंबर 2015 रोजी मंजुरी दिली आहे. दोन्ही कामांची निविदा अनुक्रमे 1 कोटी 5 लाख 39 हजार रूपये आणि 1 कोटी 5 लाख 50 हजार रूपये अशी होती. ठेकेदाराने ही दोन्ही कामे कमी दरात 2 कोटी 6 लाखात करण्याची तयारी दर्शविली आहे.

त्यानुसार, आर्यन पंप्स अ‍ॅण्ड एन्व्हायरो सोल्युशन्स यांच्याकडून काम करून घेण्यास तसेच सुरूवातीस एक वर्षे कालावधीसाठी येणा-या खर्चास मान्यता मिळाली आहे. आर्यन पंप्स यांनी हे काम समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे. या कामाची पाच वर्षापैकी पहिल्या दोन वर्षाची मुदत पूर्ण होत आहे. त्यामुळे तिसर्‍या वर्षासाठी त्यांना हे काम देण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. सद्यस्थितीत डिझेल व लेबरचे दर आणि कामाची निविदा भरली त्यावेळचे दर याची तुलना करता 14.90 टक्के दर जास्त आहे. त्यामुळे ठेकेदाराला 10 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे.