ढोल-ताशांच्या गजरात निरोप

0

शहापूर । शहापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 40 सार्वजनिक तर 650 घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन भारंगी नदी, सापगाव भातसा नदी, गंगा देवस्थान, बसवंत कॉलेजजवळील तलाव आदी ठिकाणी करण्यात आले. गणेश उत्सवात डीजे किंवा डॉल्बी लावल्यास कारवाई करण्यात येईल. अश्या स्वरूपाची जनजागृती पोलिसांनी शांतता कमिटी आणि सार्वजनिक मंडळांच्या बैठकीच्या माध्यमातून केली होती. डिजे बंदीच्या जनजागृतीला शहापुरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहापूर पोलिस निरीक्षक महेश शेट्येे यांनी कायदयाचे पालन करून सहकार्य करणार्‍या मंडळांचे अभिनंदन केले जात आहे. मात्र डीजे बंदीमुळे आगामी काळात पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस येणार आहे.

डीजेच्या कर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते. तसेच मानवी शरीरावर घातक दुष्परिणाम होत असल्याने न्यायालयाने त्यावर बंदी आणली होती. त्यामुळे शहापूर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता कमिटी तसेच सार्वजनिक मंडळे, ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या बैठकीत डीजे बंदीची जनजागृती केली. तर मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास मंडळावर व वैयक्तिक गुन्हेही दाखल होणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या डीजे बंदी जनजागृतीचा मंडळांनी आणि तरुणांनी सारासार विचार केल्याचे चित्र शहापुरात दिसून आले. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी ढोल ताशांसह पारंपरिक वाद्याचा वापर केल्याचे दिसून आले.