भुसावळ । रेल्वे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात प्रशासनाकडे वारंवार साकडे घालूनही दखल घेतली जात नसल्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या रेल्वे प्रशासनास जागे करण्यासाठी क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेतर्फे डीआरएम कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात येऊन सायंकाळी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी तसेच ढोल-ताशांचा गजर केल्याने डीआरएम कार्यालय परिसर दणाणून निघाला.
कर्मचार्यांतर्फे करण्यात आलेल्या मागण्या
रेल्वे स्थानकाबाहेर दक्षिण परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करावा, माजी सैनिकांना ट्रॅकमन, सफाईवाला आदी पद सोडून अन्य विभागात नियुक्ती करावी, पॉईंटस्मन, गेटमन यांच्या कामाची वेळ 12 तासावरुन 8 तास करण्यात यावी, नवीन पेंशन योजना बंद करुन जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी, लार्जेस स्कीम पीओएचसह सर्व विभागात लागू करण्यात यावी, टीआरडी विभागात रिस्क अलाऊंस देण्यात यावा आदी मागण्यांसाठी एडीआरएम अरुण धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
केेंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी, केंद्रीय सरचिटणीस दिवाकर देव, नरेंद्र शिंदे, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडळ कार्याध्यक्ष प्रदीप भुसारे, मंडळ सचिव राजेश लखोटे, मंडळ खजिनदार शंकर कुमावत, महिला आघाडी मंडळ अध्यक्ष जयश्री पुणतांबेकर, नरेश बुरघाटे, जर्नादन देशपांडे आदींच्या नेतृत्वात आंदोलन झाले. मंडळ उपाध्यक्ष रामदास आवटे, प्रीतम टाक, मंगु खंडू, विनोद वाघे यांनी परिश्रम घेतले.