ढोल-ताशा पथकांनी जिंकली उपस्थितांची मने!

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड नवरात्र महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या ‘ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा तालघोष’ या समूह वादनाच्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाच ढोल-ताशा पथकांनी एका सुरात लयबद्ध वादन करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. सुमारे 300 ढोलचा दणदणाट नागरिकांनी अनुभवला. चिंचवड बस स्थानकाजवळील प्रांगणात रविवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, ’ब’ प्रभागाचे अध्यक्ष सचिन चिंचवडे, भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे, रवी नामदे, गजाजन चिंचवडे आदी उपस्थित होते.

पारंपरिक संस्कृतीची जोपासना
पारंपरिक वाद्यांच्या संस्कृतीची जोपासना केल्याबद्दल ताशा प्रशिक्षक ज्ञानप्रबोधिनीचे राजण घाणेकर, ढोल-ताशांचे व्यापारी जीवन काकडे आणि ढोलताशा महासंघ पुणे यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, डीजेचा वापर टाळणे गरजेचे आहे. पारंपरिक वाद्यांचा जास्तीत-जास्त वापर करणे गरजेचे आहे, असे बारणे यांनी सांगितले.

पाच पथकांचा सहभाग
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, पुण्यातील नूमवि वाद्यपथक, श्री शिव दुर्गा ढोल-ताशा पथक, एक दिल ताशा पथक सहभागी झाले होते. चिंचवड नवरात्र महोत्सवांतर्गत गेल्यावर्षीही ताल-घोष कार्यक्रमात सामूहिक तबला वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश गोलांडे, दत्तात्रय संगमे यांनी संयोजनात पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पाखरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार महेश बारसावडे यांनी मानले.