ढोल ताश्यांच्या गजरात गणरायाला शांततेत निरोप

0

चाळीसगाव । गेल्या 10 दिवसांपासुन विराजमान असलेल्या गणपती बाप्पांना मंगळवार 5 सप्टेंबर 2017 रोजी विसर्जन करुन निरोप देण्यात आला. यावेळी तालुका व शहरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरवर्षी माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम व कार्यकर्ते मुर्ती संकलन करत असत, मात्र यावर्षी हनुमानवाडी येथे नगरपरिषद व भाजयुमोच्या वतीने मुर्ती संकलन करण्यात आले. तालुका व शहरात गणपती विसर्जनासाठी दुपार पासुन मिरवणुकांना सुरुवात झाली. चाळीसगाव नगरपालिकेतर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन हे अभियान राबविले गेले. शहरात मंगळवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अभियानाला सुरुवात झाली. गणपती मूर्ती संकलनासाठी शहरात हनुमानवाडी, सावरकर चौक, कॅप्टन कॉर्नर या तीन ठिकाणी केंद्र उभारण्यात आले होते. निर्माल्यासाठीदेखील संपूर्ण शहरातून घंटागाड्या फिरवल्या जात आहेत. धुळे रोड, हिरापूर रोड, नवीन नाका, खरजई नाका, शिवाजी घाट, चामुंडामाता मंदिर पूल, अहिल्यादेवी होळकर चौक, दत्तवाडी पूल, सदानंद हॉटेल जवळ अशा दहा ठिकाणी निर्माल्य संकलन केले गेले. आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेनुसार अभियान राबविण्यात आले. नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण, गटनेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी नागरिकांना मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रावर जाऊन पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन केले होते. चाळीसगाव शहरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविले जात असुन मूर्ती व निर्माल्य संकलनामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन अभियानाचे पर्वच या वर्षापासून सुरू होत असल्याची प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.

ढोल ताश्यांच्या गजरात गणरायाला शांततेत निरोप

सुवर्णाताई देशमुख नवरात्रोत्सव मंडळातर्फेही गेल्या 15 वर्षापासून गणेश विसर्जनाच्या पर्वावर मूर्ती व निर्माल्य संकलन केले जात आहे. या उपक्रमामुळे शहरातील अनेक विहिरींचे प्रदूषण थांबले. विशेष म्हणजे हनुमान वाडीतील विहीर पुर्नजिवीत झाली आहे. पूर्वी याच विहिरीत गणेश विसर्जन केले जायचे. मंडळातर्फे संकलित मूर्ती धरणाच्या पाण्यात एकत्रितपणे विसर्जित केल्या जातात. मंडळाचे अध्यक्ष व पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम यांनी हा उपक्रम 15 वर्षापुर्वी सुरु केला आहे. त्यांच्या मंडळामार्फत हनुमानवाडीत मूर्ती संकलन केले जाते. यावर्षी नगरपरिषद व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे कार्यकर्ते आणि नगरसेवक यांच्या वतीने मूर्तीचे संकलन करण्यात आले. गणपती पाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी शहर दुमदुमले होते रात्री उशीरापर्यंत शांततेने गणपती विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जन शांततेत व्हावे, यासाठी डीवायएसपी अरविंद पाटील, शहर पोनि रामेश्वर गाडे पाटील, ग्रामीण पोनि भाऊसाहेब पटारे, मेहुणबारे सपोनि दिलीप शिरसाठ व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अमळनेरात सिमेंट बंधारा बनवून मूर्ती विसर्जनासाठी केली व्यवस्था
अमळनेर । प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्यांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी येथील अमळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी चोपडा रोडवरील सिमेंट बंधार्‍यात अमोनियम बायकार्बोनेट टाकून मूर्ती विसर्जन करण्याची व्यवस्था करून दिली. त्यातून खतनिर्मिती करण्यात आले. अमळनेर पालिकेतर्फे पर्यावरण पूरक गणपती विसर्जन पार पाडले. नगरपालिकाच्या पाणीपुरवठा योजनेतील वाया जाणारे पाणी चोपडारोड वरील गो शाळेजवळील सिमेंट बंधार्‍यात साचते त्यात अमोनियम बाय कार्बोनेट टाकले तर शुद्ध पाण्यात मूर्ती विसर्जन होऊन खत निर्मिती होऊ शकते अशी संकल्पना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मांडली. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी नगरपरिषदे मार्फत गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली सिमेंट बंधार्‍यातील स्वच्छ पाण्यात 100 किलो अमोनियम बायकार्बोनेट टाकले शहरातील गणेश मूर्त्यांचे त्यात विसर्जन करण्यात आल्याने प्लास्टर ऑफ पँरिसचे जैविक विघटन होऊन रासायनिक अभिक्रिया होते त्यातून अमोनियम सल्फेट खत तयार होते नगरपरिषदेने ठिकठिकाणी फलक लावून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाचे आवाहन केले होते. त्यास अमळनेरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुटे, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, बांधकाम सभापती मनोज पाटील, पाणीपुरवठा सभापती राजेश पाटील, कमलबाई पाटील, शीतल यादव, विक्रात पाटील, राजेंद्र यादव, डॉ.उदय अहिरराव, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अभियंता संजय पाटील, योगेश महाजन यांच्यासह सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभले.

एरंडोलला गणेश विसर्जन शांततेत; सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी
एरंडोल । शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. विसर्जन मिरवणुकीत अठरा सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी झाले होते, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व मुस्लीम समाज बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील विसर्जन मिरवणुकीस दुपारी चार वाजता सुरुवात करण्यात आली.जयगुरु व्यायाम शाळेचा गणपती प्रथम क्रमांकावर होता.पहाटे अडीच वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक उपस्थित होते. यावर्षी मिरवणुकीत गुलालाचा अत्यंत कमी वापर करण्यात आला. मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.पीर बाखरूम बाबा जवळ जावेद मुजावर व बी.के.मुजावर यांचे वतीने फुलांच्या पाकळ्या टाकून प्रत्येक गणपतीचे स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मिरवणुकीतील कार्यकर्ते व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, तहसीलदार सुनीता जर्‍हाड, निवासी नायब तहसीलदार आबा महाजन, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र महाजन, दशरथ महाजन, राजेंद्र महाजन, रमेश महाजन, माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील, जगदीश ठाकूर, सुरेश खुरे, भाजपाचे ओ.बी.सि.सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, रवींद्र पाटील, रवींद्र जाधव, प्रा.शिवाजीराव अहिरराव, डॉ.नरेंद्र पाटील, नगरसेवक बबलू चौधरी, कामारली सय्यद, मनोज मराठे, शेख सांडू शेख मोहम्मद, नुरा पहेलवान, युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, युवा उद्योजक महेश देवरे, कुशल तिवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांचेसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक बाळासाहेब बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्या बद्दल पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे व नायब तहसीलदार आबा महाजन यांनी प्रशासनाच्या वतीने आभार मानले.

भडगावात लेझीमच्या तालावर बाप्पाला निरोप
भडगाव । शहरासह तालुक्यातील गणेश विसर्जनचा कार्यक्रम शांततेत पार पडला. शहरातील गणेश मंडळीनी मिरवणूकीत विविध समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. एकता चालक गणेश मंडळाने शौचालय, स्वच्छता, अवयव दानाचे महत्व पटवून देत विविध उपक्रम घेतले. तर जागृती मंडळाने ढोल ताश्याच्या गजरात लेझिमच्या तालावर काही मंडळानी वेगवेगळ्या वेशभुश्या व प्रयोग करत विसर्जन मिरवणूक काढली. यशवंतनगर भागातील गणेश मंडळीनी तवळीत तर गावातील गणेश मंडळानी गिरणा नदी पात्रात विसर्जन केले. तसेच नगरपरिषद चौकात शिवसेना व राष्ट्रवादी कडुन प्रत्येक गणेश मंडळाचे अध्यक्षाचे स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलिप वाघ, नगराध्यक्ष शामकांत पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, नगरसेविका योजनाताई पाटील, संतोष महाजन, रविद्र पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक पाटील, सचिन चोरडीया, शंकर पाटील आदी उपस्थितीत होते

गरूड महाविद्यालयात निर्माल्य संकलन
शेंदुर्णी । शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककच्या वतीने गणपती विसर्जनाचे औचित्य साधुन निर्माल्य संकलन केले. वनस्पतीशास्त्रातील संशोधक प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी या प्रसंगी पर्यावरण विषयक जागृती करावी, असे मार्गदर्शनातून सांगितले.

याप्रसंगी स्वयंसेवक विदयार्थळनी शेदुर्णी गावातील विविध मंडळांना भेटी देत निर्माल्य संकलन केले. जमा केलेल्या निर्माल्या चे कंपोस्ट खतात रूपांतर करण्यासाठी महाविद्यालयाच्या परीसरात शास्त्रोक्त पध्दतीने पुरण्यात आले. आदर्श महाविद्यलय गरुड महाविद्यालयाच्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सदर प्रसंगी रा से यो कार्यक्रम आधिकारी डॉ आर डी गवारे , वर्ग 2 चे कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.जे.सोनवणे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश पाटील व वर्ग 2 चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.आप्पा महाजन, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.वाय.पी.चौधरी मॅडम, शा.शि.संचालक प्रा. महेश पाटील व स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.