जळगाव- शहरासह जिल्ह्यात विविध संस्था, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे, शैक्षणिक संकुले, वसतिगृह तसेच घरगुती गणपती प्राणप्रतिष्ठेचा गणेश चतुर्थी सोहळा ढोल ताशांचा गजर व गुलालाची उधळण करीत भाविकांनी मोठ्या श्रध्देने साजरा केला. वरुण राजाने प्रत्यक्ष या सोहळ्यास हजेरी लावून भाविकांचा आनंद व्दिगुणीत केला. मनपासह विविध शासकीय अस्थापना, शालेय व महाविद्यालयीन संस्था, शासकिय व खासगी वसतिगृहे तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावर मिरवणूकीने श्री गणरायाच्या मुर्तीची वाजत-गाजत जावून विधीवत पूजा-अर्चा करुन वैदिक मंत्राच्या उद्घोषात स्थापना केली.
आर.आर.विद्यालयात ‘श्रीं’ची स्थापना
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यु. इंग्लिश मिडियम स्कूल, भा.का.लाठी विद्यामंदिर, शिशुविहार, रावसाहेब रुपचंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘श्री’ गणरायाची वाजत-गाजत स्थापना करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरुन विद्यार्थिनींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन भाविकांची मने जिंकली. उत्सवाच्या प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीसह विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह शाळेपासून गुजरात स्विट मार्ट, चित्रा चौक, शास्त्री चौक, जेडीसीसी बँक चौक, अनिल प्रोव्हिजन, इच्छापुर्ती गणेश मंडळ या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी लेझीम व झांज नृत्यात आकर्षक कलाकृती सादर केल्या. भा.का. लाठी विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता’ या विषयावर राष्ट्रीय भाषेत नाटीका सादर करुन उपस्थितींची दाद मिळविली. आर.आर.कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधक लेझिम पथकाने मनोवेधक कसरती सादर केल्या. मानद सचिव मुकुंद लाठी यांनी सपत्नीक गणेशाचे पूजन करुन स्थापना केली. सुभाष जोशी यांनी पौरोहीत्य केले. भा.का.लाठी विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी गणेशाची आरती व गणेश मंत्र म्हटले. त्यांना साथसंगत उपशिक्षक सुतार व श्रीमती श्रध्दा चौधरी यांनी दिली. यावेळी संस्थाध्यक्ष अरविंद लाठी, उपाध्यक्ष दिलीप लाठी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. याप्रसंगी सुधाकर भोळे, विजय लाठी, अनिल लाठी, श्रध्दा चांडक, शिक्षणतज्ज्ञ एम.के.कासट आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक गजमल नाईक, प्राचार्य योगेश चौधरी, प्रा. कविता सोनवणे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डी.पी.पाटील, प्रतिभा गाढे, माधुरी पाटील, माया पानपाटील, प्रिती जावळे, मुकेश चौहाण, रविंद्र पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
केसीई वसतिगृहात विविध स्पर्धांचे आयोजन :
उत्सवाच्या दहाही दिवशी रात्री 8 वाजता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 26 रोजी अंताक्षरी, 27 रोजी रांगोळी स्पर्धा व रक्तदान शिबिर, 28 रोजी डम शेल आर्ट, 29 रोजी मेहंदी, 30 रोजी संगीत खुर्ची, 1 रोजी सामाजिक जागरुकता या विषयावर किर्तन, 2 रोजी मू.जे.महाविद्यालय संगीत व डान्स विभाग यांचेतर्फे कार्यक्रम, 3 रोजी स्नेहसंमेलन, 4 रोजी भंडारा, 5 रोजी गणेश विसर्जन आदी कार्यक्रम होणार आहेत. यासाठी अध्यक्षा सुप्रिया चौधरी, उपाध्यक्षा चेतना अहिरराव, जागृती कुलकर्णी, अंकित वराडे, शुभांगी सूर्यवंशी, किर्ती अहिरराव, स्नेहा पाटील, एैश्वर्या भिरुड, पल्लवी पाटील, सुनिता भामरे, जयश्री महाजन यांच्यासह सर्व कमिटी चेअरमन, सदस्य व वसतिगृहातील विद्यार्थिनी सहकार्य करीत आहेत.
मुलींच्या वसतिगृहात इको फे्ंरडली गणेशोत्सव
शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थीनी येथील केसीई सोसायटीच्या मू.जे.महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतिगृहात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव साजरा करतांना या विद्यार्थिनी दरवर्षी वेगवेगळी कल्पना घेवून तो साजरा करत असतात. विविध विषयांवर सामाजिक भान ठेवून वैविध्यपुर्ण आरास तसेच व्यक्तिमत्व विकस विषयक उपक्रम साजरे करणार्या गणेशोत्सवाचे या वसतिगृताचे हे 17वे वर्ष आहे. 2000 मध्ये या उपक्रमाची तत्कालीन विद्यार्थिनींनी सुरुवात केली होती. ती आजतागायत विद्यार्थिनींनी कायम राखली आहे. आतापर्यंत राज्याबाहेरील आसाम, मणिपुर, अरुणाचल, ओरिसा, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड या राज्यातुनही विद्यार्थिनींनी येथील रहिवास काळात गणेशोत्सव साजरा केला होता. या वर्षी विद्यार्थिनींनी मुर्तीच्या आजुबाजुला इंडियन आर्मी या विषयावर देखावा तयार करणार आहे. प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी त्यांनी इको फे्ंरडली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी गणेशमुर्ती शाडुच्या मातीची घेण्याचे ठरविले आहे. आरासासाठी फक्त फुलांचा व कापडाचा वापर करणार आहे. सर्व कामे करण्यासाठी मुलींच्या वेगवेगळ्या कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. तर विसर्जनाच्यादिवशी विद्यार्थिनी दरवर्षी प्रमाणे खास महाराष्ट्रीयन पध्दतीचा भगवा फेटा बांधुन विसर्जन मिरवणूक काढणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया चौधरी व सचिव जागृती कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच यावर्षी गणेशाची आरती झाल्यावर लगेच राष्ट्रगीत होणार आहे.