ढोल वादनाचा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला

0

पुणे । सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण होत असल्याच्या नावाखाली शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणार्‍या महापालिकेचा विश्वविक्रमी ढोल वादनाचा कार्यक्रम सलग दुसर्‍यांदा पुढे ढकलण्याची नामुष्की एकाच आठड्यात सलग दुसर्‍यावेळी रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. आधी 23 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार होता. परंतु पोलिसांनी मनाई केल्याने तो पुढे ढकलण्यात आला. बालेवाडी येथे रविवारी (दि.27) हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, त्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या आवश्यक परवानग्या न मिळाल्याने हा कार्यक्रम आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

5 हजार ढोल वाजवून विश्वविक्रम
महापालिकेकडून या कार्यक्रमासाठी तब्बल 40 लाखांचा खर्च केला जाणार असून एकाच वेळी 5 हजार ढोल वाजवून विश्वविक्रम केला जाणार होता. या पूर्वी कोल्हापूर येथे एकाच वेळी 1600 ढोल वादनाचा विक्रम करण्यात आला आहे. हा विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. त्यासाठी ढोल ताशा महासंघाच्या मदतीने शहरातील सर्व ढोल पथके महापालिकेच्या या व्यासपीठावर आणण्यात येणार होती.

तांत्रिक परवानग्या नाही
गिनिज बुकच्या आवश्यक असलेल्या तांत्रिक परवानग्या न मिळाल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. गणेशोत्सवकाळातच हा उपक्रम करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
-मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष

ढोलपथकांची अडचण
आता हा वादनाचा कार्यक्रम 3 सप्टेंबर रोजी घेण्याचे पालिकेने नियोजित केल्याची चर्चा सुरू आहे. हा गणेशोत्सवाचा दहावा दिवस आहे. या दिवशी बहुतांश मंडळाच्या समोर ढोल पथकांचे स्थिरवादन असते. या वादनाच्या सुपार्‍याही ढोल पथकांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता पालिकेस 5 हजार ढोल वादक मिळतील का नाहीत याबाबत शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, महासंघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये झालेल्या विश्वविक्रमापेक्षा अधिक ढोल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिकेस दिले असले तरी, हा कार्यक्रम होईल का नाही याबाबतच आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.