प्रशासनापेक्षा भाजपवर खापर फोडले गेले
पुणे । गणेशोत्सव संपला तरी महापालिकेतील भाजप त्यातून अजून बाहेर आलेला नाही आणि सामूहिक ढोल वादनाच्या कार्यक्रमात या पक्षाच्या पदरी पुन्हा नामुष्की पडणार का? अशी चर्चा चालू झाली आहे.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव अशी घोषणा महापौरांसह भाजपच्या नेत्यांनी केली. त्यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने त्याला आक्षेप घेतला. हा वाद अगदी विसर्जन मिरवणुकीपर्यंत चालू राहिला. त्याचप्रमाणे ढोल-ताशा वादनाचा जागतिक विक्रम नोंदविण्याची घोषणा करण्यात आली. एकाच वेळी 5 हजार वादक यात सामील होतील आणि गिनीज बुकमध्ये नोंद होईल असेही सांगण्यात आले. येत्या 10 तारखेला बालेवाडी येथे सादरीकरण होईल असे म्हटले गेले, पण त्याबाबत आज कोणीही ठामपणे सांगू शकले नाही. तसेच गिनीज संस्थेकडून परवानगी आली का याचेही स्पष्टीकरण झालेले नाही.
10 सप्टेंबर बाबतही संभ्रम
याअगोदर 23 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम ठरला होता. कोणतीच पूर्वतयारी नसल्याने ही तारीख उलटून गेली पण ढोल काही वाजला नाही. मग 27 तारीख दिली गेली. त्या दरम्यान महापालिकेची सायकल रेली साफ फसली. त्यात तर गर्दी नसल्याने पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमापूर्वी निघून गेले. पाठोपाठ 27 तारीख हुकली. पालिका सांस्कृतिक कार्यक्रमात खासदार काकडे आलेच नाहीत. एकामागोमाग एक तारखा जाहीर करण्याचा सपाटा चालूच राहिला. पुन्हा 3 सप्टेंबर अशी तारीख ढोल वादनासाठी मुक्रर झाली. त्याचवेळी अचानकपणे ढोलची संख्या पाच हजाराहून सोळाशेपर्यंत खाली आली. तेही एक गौडबंगाल ठरले. हा सगळा खटाटोप चालू असताना प्रशासनापेक्षा भाजपवर खापर फोडले जाऊ लागले. दि.10 सप्टेंबर तारीख ठरली पण त्याहीबाबत संभ्रम आहे.