मुंबई: मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक भाजपच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आले. यावरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले आहे. विरोधक भाजपवर आरोप करत असून भाजपकडून शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान काल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असे विधान उदयनराजे भोसले यांच्या संदर्भात केले होते. यावरून आता नवीन वाद सुरु झाला आहे. राऊत यांच्या या विधानावरून भाजप आक्रमक झाली असून पोलिसात गुन्हा दाखल करत आहे. दरम्यान आज गुरुवारी पुन्हा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.काही विषयांवरून काही जाणांनी वादाला तोंड फोडले. त्यामुळे आम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागली. तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक यांच्याबाबत काहीही बोलाल, हे कसे काय खपवून घेतले जाईल. आम्ही तुमचा आदर राखतो. तुम्हीही आमचा आदर राखा. देशात लोकशाही आहे, तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही, असा टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला.
उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे विधान केले होते. त्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आणि देशाचे नव्हे तर विश्वाचे दैवत आहे. आम्हाला शिवरायांबाबत सार्थ अभिमान आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही.”
”छत्रपतींच्या गाद्यांबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. शिवरायांचे वंशज असलेल्या शिवेंद्र राजे आणि संभाजीराजेंबद्दल आमच्या मनात कायम आदर राहिला आहे. कोल्हापूरचे सध्याचे छत्रपती शाहू महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे या शिवसेनेमध्ये होत्या, शिवसेनेकडून त्यांनी निवडणुकही लढवली होती. अशाप्रकारे शिवरायांच्या वारसदारांचा शिवसेनेशी संबंध राहिला आहे.”असेही राऊत यांनी सांगितले.