तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडणुकीवरून वाद

0

डोर्लेवाडी । स्वातंत्र्यदिनाची तहकूब झालेली झारगडवाडी ग्रामपंचायतची सभा सोमवारी तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडणुकीवरून वादावादीत पार पडली.

सुरुवातीला अजेंड्यावरील सर्व विषय वाचून दाखवण्यात आले. त्यावरील अनेक विषय प्रोसिडिंगवर उतरवण्यात आले. त्यामधील घरकुल व अंतर्गत रस्त्यावरील झालेली नादुरुस्ती यावरून खडाजंगी पाहायला मिळाली. नंतर ऐनवेळचे विषय घेण्यात आले त्यामध्ये मंगळवारी (दि. 15) तंटामुक्ती अध्यक्ष निवड होणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामसभेचा कोरम पूर्ण नसल्याने सभा तहकूब करण्याची नामुष्की ग्रामविकास अधिकार्‍यांवर आली होती. त्यामुळे तहकूब झालेली सभा सोमवारी 10 वाजता सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यात ग्रामविकास अधिकार्‍यांनी तंटामुक्ती अध्यक्ष होण्यास इच्छुक असणार्‍यांची नावे दिली. यात कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडण्यात यावा, असे आलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, ग्रामविकास अधिकार्‍यांनी निवड रद्द करून तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी स्वतंत्र ग्रामसभा घेऊन मतदान घेऊ, असे म्हणून सभा संपवली. अनेक जण म्हणत होते की निवड आताच होऊ द्या. सभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष निवडण्यास कोणाची काहीच हरकत नव्हती मग स्वतंत्र ग्रामसभा कशासाठी? नियमाने तहकूब झालेल्या सभेनंतर परत त्याच विषयावर स्वतंत्र सभा घेता येत नाही तर ग्रामविकास अधिकारी कुठल्या नियमाने स्वतंत्र सभा पुन्हा घेणार आहेत हाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे.