तंत्रज्ञानाची प्रगती कल्पनातीत वेगाने होत असल्याने त्यावर प्रभुत्व मिळवावे

0

पुणे । गेल्या 100 वर्षात मानवजातीच्या प्रगतीचा वेग हा त्यापूर्वीच्या हजारो वर्षांपेक्षा अधिक होता. अलिकडच्या 10 वर्षात तर या वेगाने कल्पनातीत झेप घेतली आहे. म्हणून पदवीधरांनी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळविण्याचा सदैव प्रयत्न करीत रहावे, असे उद्गार माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांनी काढले. माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मॅक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्मश्री डॉ. राबी बस्तिया, प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा.प्रकाश जोशी, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, डॉ. एम. मृगानंद, डॉ. एल. के. क्षीरसागर, प्रा.डी.पी. आपटे व प्रा. डॉ. एम.वाय. गोखले उपस्थित होते.

गोडबोले म्हणाले, तंत्रज्ञानाचा विकास जरी होत असला, तरी माणुसकीच्या दृष्टीने मात्र जगाची प्रगती झालेली नाही. आजही युद्धे, रक्तपात व तत्सम हिंसात्मक घटना घडतच आहेत. म्हणून प्रत्येकाने तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजेच. पण त्याशिवाय एक सामाजिक देणे म्हणून ग्रामीण क्षेत्रातील पाण्याच्या टंचाईसारख्या अनेक मूलभूत समस्या सोडविण्यासाठीसुद्धा पुढे यावेे. डॉ. बस्तिया म्हणाले, सकारात्मक विचार सरणी, आत्मविश्‍वास, जागेपणी मोठे स्वप्न पाहण्याची वृत्ती, त्यांना प्रत्यक्षात उतरविणे आणि मानवता हेच यशाचे व सुखाचे मूळ गमक आहे.

भारत हे ज्ञानाचे दालन
प्रा. डॉ. कराड म्हणाले, व्यावहारिक जगात असताना आपल्या चारित्र्यावर शिंतोडे पडणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार 21वे शतक हे भारताचेच असेल. संपूर्ण जगात भारत हे ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.

650 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
यावेळी मेकॅनिकल, सिव्हील, ई अ‍ॅन्ड टीसी, कॉम्प्युटर, आयटी, पॉलिमर, पेट्रोलियम व पेट्रोकेमिकल इत्यादी विद्याशाखेतील सुमारे 650 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. प्राचार्य डॉ. क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. साजिदा शिकलगार यांनी केले.