तंत्रज्ञानाच्या मदतीने डुप्लिकेट मतदार पकडले जाणार

0

मुंबई : गेल्या लोकसभेपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीरसभेत केलेल्या एका विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतलेली दिसते. शहरात व गावात वेगळ्या दिवशी मतदान असल्याने, आधी एका जागी शिक्का हाणायचा आणि नंतर बोटावरची शाई पुसून, अन्य दिवशी दुसरीकडे मतदान करायचे, असे मार्गदर्शन पवारांनी एका सभेत गंमतीने केलेले होते. पण असे मतदान ज्यामुळे शक्य होते, त्यालाच पायबंद घालण्याची तयारी आता आयोगाने केली आहे. दोन वा अधिक जागी नाव नोंदवलेल्या मतदारांना हुडकून काढून, याद्यांमध्ये काटछाट व्हायची आहे.

तंत्रज्ञानाची मदत घेऊन देशाच्या कुठल्याही राज्यात वा जिल्हा तालुक्यात एकाच व्यक्तीने अधिक वेळा नाव नोंदलेले असेल, तर ते यातून शोधले जाऊ शकणार आहे. समान नावे व छायाचित्रे यांना वेगळे काढून, त्यांची छाननी करणारी व्यवस्थाच त्यासाठी उभारली आहे. सहाजिकच तशा मतदाराला कुठल्या तरी एका जागी नाव कायम ठेवण्यास मुभा दिली जाईल आणि दुसर्या जागचे नाव रद्द केले जाईल. दोन वा अनेक जागी मतदार नोंदणी केली जाते आणि त्यातूनच बोगस मतदान करून आणले जाते. त्याला यामुळे वेसण घातली जाऊ शकते.

अनेक मोठ्या शहरात काही टोळ्या पद्धतशीरपणे अशी बोगस नोंदणी करतात. त्यातून नेहमी बोगस मतदानाच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याला यामुळे शह दिला जाणार आहे. कदाचित या मोहिमेमुळे मोठ्या संख्येने डुप्लिकेट मतदार घटतील आणि प्रथमच नव्या मतदार यादीत मतदारसंख्या वाढण्याऐवजी घटलेली दिसू शकेल.