तंत्रज्ञानाच्या युगात अ‍ॅण्ड्रॉईड फोनचा ‘स्मार्ट’ वापर!

0

तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग नेत्रदीपक असा आहे. आज वापरात असलेले तंत्रज्ञान काही महिन्यांत नव्हे तर काही दिवसांत कालबाह्य होते. पूर्वी हा वेग एवढा गतीमान नव्हता. म्हणूनच तर ‘कॅसेट्स’, ‘व्हीसीआर-व्हीसीपी’, ‘टेप-रेकॉर्डर’, ‘वॉकमॅन’, ‘फ्लॉपी’, ‘सीडी’ इत्यादी वस्तू बर्‍याच काळापर्यंत वापरात राहिल्या. आता तर घरात खणखणणार्‍या फोनने कमालीची कात टाकली. ‘फोन’, ‘कॅमेरा’, ‘रेकॉर्डर’, ‘अलार्म क्लॉक’, नानाप्रकारची अ‍ॅप्लिकेशन्स आणि सोयींनीयुक्त असा हा स्मार्टफोन केवळ फोन न राहता एक अत्यावश्यक मदतनीस आणि मार्गदर्शक बनला आहे. स्मार्टफोन दिवसागणिक अधिकच स्मार्ट होताना दिसतो आहे. आपल्या गरजेनुसार वापरकर्ते उपलब्ध विविध अ‍ॅप्लिकेशन्समधून आवश्यक असलेली अ‍ॅप्लिकेशन्स फोनमध्ये इन्स्टॉल करतात. अगदी किचनपासून ते ऑफिसमधील कामात उपयोगी पडतील, अशी नानाविध अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोन निर्जीव असला तरी ‘फिंगर स्कॅन’, ‘आय स्कॅनर’, ‘स्पीच-टू-टेक्स्ट’सारख्या सुविधांनी फोनला स्पर्श होताच आपल्या वापरकर्त्याला एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे ओळखतो.

दैनंदिन कामांसाठी मोबाइल फोनचा वापर करणार्‍यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सगळीकडे मोबाइलचा वापर अधिक होत आहे. मोबाइल आजकाल अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडला जात आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांपासून ते जवळपास सर्वच वयोगटांतील मोबाइलधारक आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांना तर स्मार्टफोनची इतकी सवय असते की, त्यांना फोनशिवाय एक मिनिटही करमत नाही. मोबाईलशिवाय फार अवघडल्यासारखे वाटते. मोबाईल जर चॅर्जिंग नसेल बंद पडला तर वापरकर्त्याला प्रचंड अस्वस्थ वाटते. अर्थातच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन बहुतेकांना गरजेचाच बनला आहे. मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेला की त्यात असलेला आपला प्रायव्हेड डेटा दुसर्‍या कुणाच्या हाती जाण्याची शक्यताच अधिक असते. आणि यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते. स्मार्टफोनमध्ये क्रेडिट कार्डची माहिती, बँक खाते क्रमांक, पासवर्डस् इत्यादी पर्सनल माहिती ठेवतात तसेच व्यावसायिक मोबाइलमध्ये कॉर्पोरेट डॉक्युमेंट्सही सेव्ह करतात. ज्यामुळे वेळेवर ती त्यांना उपलब्ध होतात; परंतु मोबाइल हरवल्यास ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या हातून निघून जाते. अलीकडच्या काळात मोबाइल फोनवर अनेक हल्ले होत आहेत. मोबाइल हॅकर्स वापरकर्त्यांचा जीपीएस ‘हॅक’ करून त्याच्या दिनक्रमाची माहिती सहज मिळवू शकतात आणि याचा वापर घरफोडीसारख्या गुन्ह्यांसाठीही करता येऊ शकतो.

क्लिअर कॅचे डेटा
आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक अ‍ॅप्स असे आहेत की ज्याचा वापर आपण फार क्वचित करतो. पण ते अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये असणेही महत्त्वाचे ठरते. यामध्ये मोबाइल पाकिटांचे अ‍ॅप्स असतील किंवा विमान, हॉटेल आरक्षण करणारे अ‍ॅप्स असतील. याचा वापर आपण कधीतरी करतो. पण त्याचा फायदा नक्कीच होतो. अशा कमी वापरातील तसेच वापरातील अ‍ॅप्सचे कॅचे डेटा आपण नियमित उडविला पाहिजे. त्यामुळे आपल्या मोबाइलच्या रॅमचा वापर नियंत्रित होऊन मोबाइल वेगाने काम करू शकतो. हे करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप इन्फोमध्ये जा व प्रत्येक अ‍ॅप सुरू करून तेथे दिलेल्या क्लिअर कॅचे डेटा या पर्यायावर क्लिक करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या अ‍ॅप छायाचित्र आणि व्हिडीओ अ‍ॅपमध्ये कॅचे जमा होण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे खास करून या अ‍ॅप्सचा कॅचे डेटा नियमित उडविणे आवश्यक आहे.

अँड्रॉइडमध्ये व्यवस्थापनाचे कौशल्य खूप चांगले आहे. ही प्रणाली अनावश्यक अ‍ॅप आवश्यकता नसताना आपोआप बंद करतात. पण या सर्वामुळे फोनच्या रॅमवर येणारा ताण कमी होत नाही. आता प्रत्येक लाँचरमध्ये प्रणालीची मेमरी कमी करण्याचे पर्याय दिलेले असतात. जर फोनमध्ये ते नसेल तर मेमरी क्लीनिंग अ‍ॅप डाउनलोड करून घ्या. परंतु ते करत असताना केवळ रॅम क्लीअर करणारे अ‍ॅप्सच डाउनलोड करा. अन्यथा तुम्ही दुसरे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड केल्यास तुमचा फोन जलद होण्याऐवजी अधिक धिमा होऊ शकतो. किंवा ापणास जे क्लिन करायचे आहे ते राहीले बाजूला. मात्र दुसराच डेटा क्लिअर होईल. अर्थात आपला महत्त्वाचा डेटा क्लिअर होण्याची दाट भीती असते.

अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी काळजी घ्या…
गुगल प्ले स्टोअरवर लाखो अ‍ॅप उपलब्ध आहेत. परंतु यातील सर्वच अ‍ॅप चांगल्या उद्देशाने बनविलेले असतात असे नाही. यामुळे आपल्याला आवश्यक असलेले अ‍ॅप्सच डाउनलोड करा. केवळ मित्राने लिंक पाठवली म्हणून अ‍ॅप डाउनलोड केलेे, असे करू नका. कारण अनेक अ‍ॅप्स हे फेक असतात. ते मोबाइवर ताबा मिळवण्यासाठी तयार केलेले असतात. तसेच अनेक अ‍ॅप्स मोबाइलमधील माहिती चोरी करण्यासाठी वापरली जातात. काही दिवसांपूर्वीच गुगलने ‘प्ले कंट्रोल प्रोटेक्ट टूल’ विकसित केले आहे. ज्याचा वापर अ‍ॅपच्या स्कॅनिंगसाठी करू शकता. याचा वापर करून तुम्ही तुमचा फोन अधिक जलद काम करू शकता. तसेच अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याची विश्‍वासार्हताही तपासून पाहू शकता.

आता जे बोलाल ते मराठीमध्ये टाईप होईल
फोन तोंडासमोर धरून टाईप करायचा मजकूर बोलताच तो आपोआप मराठीमध्ये टाईप होतो. ही सुविधा उपलब्ध असलेले ‘लिपिकार’ नावाचे अ‍ॅप/की-बोर्ड अ‍ॅण्ड्रॉईड फोनधारकांसाठी ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप/की-बोर्ड विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठी भाषेसाठी प्ले स्टोअरवर ‘lipikaar marathi keyboard’ असे सर्च करा. त्यानंतर हे अ‍ॅप/की-बोर्ड आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करताना मात्र दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

सूचनांचे पालन करून अ‍ॅप/की-बोर्ड इन्स्टॉल झाल्यावर ‘नोटपॅड’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबूक’ फोन कॉलरच्या यादीसाठी आदी ठिकाणी जिथे-जिथे तुम्हाला मराठी टाईप करायचे आहे. तिथे या अ‍ॅप/की-बोर्डचा वापर करून केवळ मजकुराचे उच्चारण करून तुम्ही टाईप करू शकता. ही सुविधा सुरू करण्यासाठी लिपिकार मराठी की-बोर्डवरील मराठी पर्याय निवडून माईकच्या आयकॉनवर बोटाने टच करायचे आहे. त्याचबरोबर या सुविधेचा वापर करताना मोबाईलमध्ये इंटरनेट चालू ठेवणे गरजेचे आहे. स्मार्टफोनवर एखादा मजकूर टाईप करण्यासाठी आपण सध्यातरी मोठ्या प्रमाणावर ‘की-बोर्ड’चा वापर करतो. यासाठी विविध ‘की-बोर्ड’ अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. परंतु ‘स्पीच-टू-टेक्स्ट’ तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनवर टाईप करणे लवकरच कालबाह्य होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ‘स्पीच-टू-टेक्स्ट’ तंत्रज्ञानामुळे ज्यांना टायपिंग करण्यात अडचण आहे, अशा टेक्नोसॅव्हींना याचा फायदा होणार आहे.

sunil_adhav_janshaktiसुनील आढाव
कला संपादक,
‘जनशक्ति’
7767012211