तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम नका बनू!

0

जळगाव । नव्या गरजा आपणच निर्माण केल्या, मोबाईल, इंटरनेट, फेसबुक नव्हते तेव्हाही संवाद साधला जात होताच ना. आज तंत्रज्ञानाव्दारे पटकन संवाद साधला जातो, पण त्यातील संवेदना हरवली आहे. तांत्रिक गरजांशिवाय जगणे शिकले पाहिजे. तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम बनू नका, तंत्रज्ञानाला तुमचा गुलाम बनवा आणि स्वत:चा शोध घ्या, असा मौलिक सल्ला महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी आज युवकांना दिला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि गांधीयन सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्प सुरू झाला आहे. आज दुसर्‍या दिवसाच्या दुपारच्या सत्रात युवकांच्या प्रश्नांना तुषार गांधी यांनी मोकळेपणानी उत्तरे दिली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी युवकांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नथूराम गोडसे, भगतसिंग, फाळणीच्या काळातील संदर्भ घेत अनेक प्रश्न विचारले. त्यावर तुषार गांधी यांनी सविस्तर उत्तरे देऊन युवकांचे समाधान केले. तुषार गांधी म्हणाले, गांधीजी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नेहमी पुढे असत. त्यांच्या काळात असलेल्या टेलीग्राफ या तंत्राचा ते सर्वाधिक वापर करत. नवतंत्रज्ञानाला त्यांचा विरोध कधीच नव्हता, असे त्यांनी सांगितले.