नंदुरबार । जीवनात उपलब्ध ज्ञानाचा,पारंपरिक ज्ञानाचा आणि नवीन तंत्रज्ञान वापर केल्यास आपण आपली उपजिविका वाढवू शकतो, असे प्रतिपादन परमाणु ऊर्जा आयोगाचे सदस्य, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय विज्ञान, अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान आणि अंदाज व मूल्यांकन परिषद डॉ. अनिल काकोडकर यांनी श्रावणी येथे केले.
नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार आणि नेसू परिसर सेवा समिती खांडबारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी क्षेत्रातील समन्वित विकास प्रयोग पाहणी व प्रयोगशिल शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. काकोडकर बोलत होते. यावेळी हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष श्रीकृष्णभाई पाटील डॉ. गजानन डांगे आदि उपस्थित होते.डॉ. काकोडकर पुढे बोलतांना म्हणाले की, आपण ज्या भागात आहोत तेथे कधी कधी उपजिविकेचे साधन आटतात किंवा कमी होतात आणि मग उपजिविका चालु शकत नाही. म्हणून आपण दुसरीकडे उपजिविकेसाठी स्थलांतर करतो. स्थलांतराची समस्या सर्वदूर असून ही न थांबवता येणारी प्रक्रिया आहे. असे जरी असले तरी या परिस्थितीवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा, साधनांचा उपयोग करावा. येथील शेतकरी स्वत: कार्यरत असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येते.
नेसू नदी पुजन या विषयांवर अनुभव कथन
यावेळी उपस्थित शेतकर्यांपैकी सुनील वळवी, कृष्णा कोकणी, अर्चनाताई वळवी, सुभाष वसावे, बन्सीलाल गावीत, मानसिंग वळवी, नितीन वळवी, विष्णु वसावे व किसन वळवी यांनी राईस मिल, भाजीपाला, कांदा बिजोत्पादन, पर्जन्यमान, जलस्त्रोत उपभोक्ता गट, गांडूळ खत निर्मिती, भात मळणी यंत्र, तांदुळ विक्री, तांदुळ महोत्सव, व नेसू नदी पुजन या विषयांवर आपले कार्यअनुभव कथन केले.तत्पुर्वी डॉ. अनिल काकोडकर यांनी द्रौपदी महिला बचत गट निंबोणी यांच्या शेतकरी सुविधा केंद्रातील शेती औजार व साई पुरुष शेतकरी गट श्रावणी यांच्या दाळ मिल या प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी केली व या प्रयोगाबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन विकास गोडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेविका श्रीमती जे.जे. पवार यांनी मानले.