तंत्र शिक्षण ही आधुनिक शिक्षणाची गरज

0

डॉ .सुनील मगर : प्रा. थिटे यांना आदर्श मुख्याद्यापक पुरस्कार प्रदान

शिक्रापूर । बदलत्या शिक्षण प्रवाहात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तंत्र शिक्षण ही आधुनिक शिक्षणातील महत्त्वाची गरज असून या बदलाचे शिक्षकांनी साक्षीदार व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजवून भावी पिढीच्या ध्येय प्राप्तीसाठी नवतंत्रचा समावेश करावा, असे प्रतिपादन राज्य बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी केले. महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने आयोजित आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी पुरस्कार प्रदान सोहळा २०१७ या कार्यक्रमात ते बोलत होते. जातेगाव येथील संभाजीराजे विद्यालयाचे प्राचार्य प्रा. रामदास थिटे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आमदार राहुल कुल, डॉ. गणपतराव मोरे, हारून आत्तार, कल्याण बरडे, सुधाकर जगदाळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

५५ शिक्षकांचा गौरव
ग्रामीण व शहरी भागांत शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्‍या मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर ५५ जणांना पुरस्काराने गौरवण्यात आले. आम्हास मिळालेला पुरस्कार ही सामाजिक कृत्याची देण आहे. यामागे तत्त्वांची शक्ती उभी असून पुरस्कार म्हणजे गुणवत्तेची तीर्थयात्रा आहे. यातून सदैव प्रेरणा मिळते, असे थिटे यांनी यावेळी सांगितले. रविंद्र पानसरे यांनी सूत्रसंचालक तर प्रसाद गायकवाड यांनी आभार मानले.