तक्रारदारांना पिटाळून लावणार्‍या पोलिसांची होणार चौकशी

0

डोंबीवली – पोलीस ठाण्यातून तक्रारदारांना पिटाळून लावण्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात घडला. विशाल तावरे खून प्रकरणात 3 आरोपींना अटक झाली असली तरी, तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना जखमी अवस्थेतच पोलीस ठाण्यातून पिटाळून लावण्यात आले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त डॉ. परमबीर सिंग यांनी दिले आहेत.

मानपाडा पोलिसांची चौकशी सुरू
या प्रकरणात स्थानिक नगरसेविकेचे पती लालचंद भोईर याचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग आणि मानपाडा पोलिसांच्या दिरंगाईबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. अशोक दिघावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. मृत विशालच्या नातेवाईकानी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले. याप्रकरणी आतापर्यंत फोन कॉल रेकॉर्डसह इतर पुरावे, गोळा करण्यात आले असून त्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच यामध्ये नगरसेवकाच्या पतीचा सहभाग आहे की नाही, याबाबतचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

पोलिसांची मग्रुरी कायम
आपल्या पुतण्याच्या हत्त्येनंतर धक्का बसलेले विशालचे काका धर्मराज यांनी शनिवारी दुपारी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन फरार तीन आरोपींना अटक कधी करणार, याची विचारणा केली. यानंतर पोलिसांनी पुन्हा आपली मग्रुरी दाखवत तुम्हीच पुढचे आरोपी शोधून आणा, असे धक्कादायक उत्तर देऊन पुन्हा त्यांना पिटाळून लावले.

काय आहे प्रकरण
कल्याण-शिळ क्रॉस बदलापूर पाईपलाईन रोडवर बालाजी नावाची चाळ आहे. या चाळीच्या समोरच्या बाजूस पंढरीनाथ पाटील नामक कथित बिल्डरची जागा आहे. या चाळीतील रहिवाशांना हुसकावून ही जागा हडपण्यासाठी पाटील आणि नगरसेविका शैलजा भोईर यांचे पती लालचंद भोईर यांनी जाणूनबुजून या चाळीत राहणार्‍या कुटुंबियांना त्रास देणे सुरू केले. त्यांनी सर्वप्रथम कोणताही अधिकार नसताना या चाळीला जोडलेल्या पाण्याचे कनेक्शन खंडित केले. चाळीतील विशाल तावरे याने कथित बिल्डरने केलेल्या छळवादाला कडाडून विरोध केला. या संदर्भात त्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत तक्रार करून एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे पंढरीनाथ पाटील आणि त्याचे साथीदार संतापले. त्यांनी गुरूवारी सायंकाळी याबाबत तोडगा काढू असा बहाणा करून विशालला बंगल्यात बोलावले. यावेळी विशाल आपल्या भावासोबत तेथे गेला. दोघे त्या ठिकाणी पोहचताच पंढरी पाटील आणि त्याच्या सहकार्‍यांनी विशाल आणि त्याचा भाऊ संजय याला बेदम मारहाण केली त्या मारहाणीत विशालचा मृत्यू झाला आहे.