तक्रारपेटी बसवण्याची सर्व शाळांना सूचना

0

पुणे : शाळांमधील मारहाण किंवा विद्यार्थ्यांना होणार्‍या त्रासातून त्यांची सुटका होणार असून, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत दर्शनी भागात तक्रारपेटी ठेवण्याची सूचना राज्य सरकारने नुकतीच दिली आहे. तशा आशयाचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केले.

शाळेच्या दर्शनी भागात, प्रवेशद्वाराजवळ नजरेस पडेल अशा ठिकाणी तक्रारपेटी ठेवावी. आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी. तक्रारपेटी उघडताना शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलिस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित असावेत. ज्या ठिकाणी पोलिस प्रतिनिधी उपस्थित राहणे शक्य नसेल तिथे अन्य प्रतिनिधी असताना तक्रारपेटी उघडण्यात यावी. तक्रारपेटीमधील तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात यावे. तक्रारदाराला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. गंभीर अथवा संवेदनशील तक्रार असल्यास पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने तत्काळ त्याची दखल घेण्यात यावी. तक्रारपेटीत महिला शिक्षक अथवा विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाबाबत तक्रार केल्याचे आढळल्यास ती शाळेच्या महिला निवारण समितीसमोर ठेवण्यात यावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.