पिंपरी : पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या कारणावरून तक्रार करणार्या युवकाच्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बाप-लेकांनी कोयत्याने वार केले. यामध्ये तो तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री सॅनेटरी चाळ येथे घडली. रोहित ऊर्फ बंड्या दहातोंडे (रा. पिंपळे गुरव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. राहुल मनोज लखन (वय 23), हेमंत मनोज लखन (वय 25), मनोज लखन (वय 47) एक 42 वर्षीय महिला (सर्व रा. सॅनेटरी चाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोहितचा भाऊ संदीप दहातोंडे याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संदीप व आरोपींमध्ये पुर्ववैमनस्य आहे. त्यातूनच त्यांची भांडणे झाली होती. त्यावरून संदीपने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या कारणावरून आरोपींनी रोहितला रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास एकटा पाहून गाठले. त्यानंतर आरोपी महिलेने रोहितच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. राहुल लखनने रोहितच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आरोपीमधील हेमंत मनोज लखन हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.