सांगवी : मुलाची तक्रार न घेतल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने पोलीस कर्मचार्यास पोलीस ठाण्यातच मारहाण केली. ही घटना नवी सांगवी पोलीस चौकीत रविवारी (दि. 23) रात्री दहाच्या सुमारास घडली. साहेबगौडा वामदेव पाटील (वय 49, रा. संकल्प सिद्धी अपार्टमेंट, शितोळे नगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे (वय 48, रा. बॉडिगेट पोलीस लाईन, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हे देखील वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू सुपे नवी सांगवी पोलीस चौकीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते कर्तव्यावर असताना आरोपी पाटील चौकीत आला. त्याने त्याच्या मुलाची तक्रार का? घेतली नाही म्हणून सुपे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच छातीवर व तोंडावर मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाययक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.