मुंबई : दुखापतीमुळे चार महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज रोहित शर्मा आता पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असून यापुढे आपली स्पर्धा आपल्याशीच असणार असल्याचे रोहितने म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वन-डेत रोहितच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर लंडन येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी व वन-डे मालिकेलाही मुकला होता.
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक राष्ट्रीय वन-डे स्पर्धेत मुंबईकडून दोन लढती खेळून रोहित आपला फिटनेस सिद्ध करेल. मात्र, कसोटीत स्थान मिळवण्यासाठी रोहितला आता अजिंक्य रहाणे आणि करुण नायरशी स्पर्धा करावी लागेल. ‘माझा प्रतिस्पर्धी कोण याचा विचार मी कारकिर्दीत यापूर्वी कधीही केला नाही. माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच असते. अशाच पद्धतीने विचार करून तुम्ही तुमच्यातील खेळाडूला मोठे करू शकता. ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्याचा विचार मी करत नाही, असेही रोहितने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.