तडीपार माणसाला संरक्षण देण्यासाठी आमच्यावर नजरबंदी!

0
मुख्यमंत्र्यांचे घाणेरडे कारस्थान असल्याचा संजय निरुपम यांचा आरोप 
मुंबई: बुधवारी सकाळपासून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला सर्कल येथील राहत्या घराबाहेर आणि काँग्रेसच्या इतर जेष्ठ नेत्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत होता. एका तडीपार माणसाला संरक्षण देण्यासाठी, आमच्या सारख्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे घाणेरडे कारस्थान केले असे मला वाटते, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.
पोलीस बंदोबस्तचे कारण
पोलिसांच्या कारवाईबद्दल बोलताना निरुपम म्हणाले की, सकाळपासून माझ्या आणि मुंबईतील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसचा कोणताही मोर्चा, कोणतेही आंदोलन नसताना पोलिसांच्या या कारवाईचे काय कारण असू शकेल?  याबद्दल जेव्हा मी बंदोबस्तातील पोलिसांना विचारणा केली असता, वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे आम्ही येथे पोलीस बंदोबस्त केल्याचे त्यांनी सांगितले.
निरुपम यांनी सांगितले कि, माझ्या अंदाजाने या मागचे एकच कारण असू शकते की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज मुंबईत येणार आहेत. त्यांना आमच्या प्रश्नांची भीती वाटते आहे असे वाटते. कदाचित भाजप सरकार, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीती वाटत असेल की, अमित शाह आल्यावर आम्ही त्यांचा घेराव करू, त्यांना जाब विचारू आणि या भीतीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी आमच्या गृह कैदेचे कारस्थान रचले.
मुंबईकर जनतेला मार्गदर्शन देण्याऐवजी अमित शाह यांनी शिवसेना भाजपच्या भ्रष्ट राजनीतीचे पितळ उघडे पाडणाऱ्या विरोधकांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना विरोध करण्यापासुन रोखण्यासाठी हे पोलिसी कारवाईचे षडयंत्र रचले आणि एका तडीपार माणसाला संरक्षण देण्यासाठी, आमच्या सारख्या नेत्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे घाणेरडे कारस्थान केले असे मला वाटते, असे  निरुपम म्हणाले.