नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या डोकलाम सीमारेषेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीन दौर्यावर जाणार आहेत. परंतु, त्यापूर्वीच चीनच्या मीडियाने डोवाल यांच्यावर आगपाखड करत, डोकलाममधील तणावाला डोवालच जबाबदार असून, ते कारस्थानी आहेत, अशी टीका केली. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ’ग्लोबल टाइम्स’मध्ये ही टीका प्रसिद्ध झाली आहे. चिनी मीडिया अशाप्रकारे सातत्याने दोन देशातील तणावात तेल ओतण्याचे काम करत आहे.
डोवालांच्या दौर्यामुळे संबंध सुधारणार नाहीत!
ग्लोबल टाइम्सच्या अग्रलेखामध्ये डोवाल यांच्यावर टीका करण्यात आली आहे. डोवाल यांच्या दौर्यादरम्यान ब्रिक्स बैठकीशिवाय डोवाल आणि चीनच्या अधिकार्यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे संकेत चीन सरकारने सोमवारी दिले होते. ब्रिक्स परिषदेचे आयोजन करणारा यजमान देश प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चा घडवून आणत असतो. त्यात द्विपक्षीय संबंध आणि ब्रिक्समध्ये एकमेकांना करावयाचे सहकार्य यावर चर्चा होत असते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. राजकारण आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ब्रिक्स हे चांगले व्यासपीठ आहे, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र ’ग्लोबल टाइम्स’च्या अग्रलेखामध्ये अजबच तर्क मांडण्यात आले. डोवाल यांच्या दौर्यामुळे भारत आणि चीनदरम्यानचे संबंध सुधारतील अशी आशा भारतीय मीडियाला वाटत आहे. पण कोणतीही अर्थपूर्ण चर्चा करायची असेल तर भारताने आधी त्यांच्या हद्दीतून लष्कर मागे घ्यावे ही चीनची पहिली अट असेल. जोपर्यंत विनाअट भारत लष्कर मागे घेत नाही, तोपर्यंत ही चर्चा होणार नाही. भारताने आपला भ्रम दूर करावा. डोवाल यांच्या दौर्याने दोन्ही देशातील संबंध सुधारतील अशी भारताची समजूत असून तसे घडणार नाही, असेही या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे.
..तर चीन प्रत्युत्तर देणार!
सीमेवर पीपल्स लिब्रेशन आर्मी तैनात केली जात आहे. भारताने सीमेवरून आधी सैन्य हटवले नाही तर चीन त्याला प्रत्युत्तर देईल. आमच्या आर्मीकडे कारवाई करण्याची क्षमता आहे. ही क्षमता भारतीय सेना आणि सरकारला पेलवता येणार नसल्याची दर्पोक्तीही या अग्रलेखात करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जुलैच्या अखेरीस ब्रिक्स बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंग दौर्यावर जातील. या दौर्यात ते चीनसोबत डोकलाम मुद्यावर बोलणी करू शकतात. ब्रिक्स बैठक 27-28 जुलै रोजी होणार आहे.