तत्कालीन ग्रामसेवक व उपसरपंचाने केला 67.50 लाखांचा अपहार

0

चाकण। सन 2013 मध्ये चाकण ग्रामपंचायतच्या हद्दीत 600 मीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदाई कामासाठी परवानगी, खोदाई विकास शुल्क फी पोटी रिलायन्स जिओ इन्फो लिमिटेड कंपनीने चाकण ग्रामपंचायतला दिलेल्या 68 लाख 50 हजार रकमेतून 67 लाख 50 हजार रुपये नवनाथ मित्र मंडळाच्या खात्यावर परस्पर वटवून या रकमेचा संगनमताने स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन उपसरपंच प्रीतम शंकरसिंग परदेशी व ग्रामसेवक दयानंद कोळी यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते किशोर ज्ञानोबा शेवकरी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी माहिती अधिकारातून हा प्रकार उघडकीस आणला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सन 2013 मध्ये चाकण ग्रामपंचायतचे सरपंच काळुराम गोरे यांचेविरुद्ध चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कस्टडीत होते. त्यावेळी उपसरपंच पदावर प्रीतम शंकरसिंग परदेशी हे होते. त्यामुळे सरपंच पद रिक्त असताना सरपंचांचे सर्व कायदेशीर अधिकार परदेशी यांना प्राप्त झाले होते. दिनांक 21 जून 2013 मध्ये रिलायन्स जिओ कंपनीने चाकण ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत ऑफिस ते मस्जिद पर्यंत एकूण 600 मीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठीच्या खोदाई कामाची परवानगी मागितली होती. त्यांनतर दिनांक 15 डिसेंबर 2013 रोजी रिलायन्स कंपनीने ग्रामपंचायत हद्दीत 11 किलोमीटर खोदाई केल्याबाबत सर्व्हिस टॅक्स लेटर पाठविले होते. दरम्यानचे काळात दिनांक 4 जुलै 2013 रोजी ग्रामपंचायतीची मासिक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सदर सभेचे अध्यक्ष तत्कालीन उपसरपंच प्रीतम परदेशी होते. त्यांनी विषय क्रमांक 38 मध्ये रिलायन्स कंपनीला चाकण ग्रामपंचायत हद्दीतील शिक्रापूर रोड ते पी डब्ल्यू डी कार्यालय या दरम्यान नियमाप्रमाणे परवानगी देण्यात यावी, हा विषय घेऊन त्यावेळचे ग्रामपंचायत प्रोसिडिंग बुकमध्ये नोंद करण्यात आला.

दिनांक 20 ऑगस्ट 2013 रोजी सामान्य पावती नमुना नं. 7 पावती अ. नं. 1567 मध्ये रिलायन्स कंपनी तर्फे खोदाई कामाबाबत विकास शुल्क फी म्हणून ग्रामपंचायतकडे एक लाख रुपयांचा रोख भरणा जमा करण्यात आला. दिनांक 8 जानेवारी 2013 रोजीचे रिलायन्स जिओ कंपनीचे सरपंच व ग्रामसेवक चाकण ग्रामपंचायत यांना खोदाई शुल्काबाबत पत्र प्राप्त झाले. सदरची माहिती किशोर शेवकरी यांनी माहिती अधिकारांतर्गत प्राप्त केली. त्यामध्ये पत्र पाठविण्याचा दिनांक 8 जानेवारी 2013 असून संदर्भ 15 डिसेंबर 2013 असा सर्व्हिस टॅक्स लेटर नावाचा उल्लेख असलेला आहे. सदर मराठी पत्रात रिलायन्स जिओ कंपनीने आपल्याला प्राप्त झालेल्या खोदाई शुल्क 68 लाख 75 हजाराचे सर्व्हिस टॅक्स लेटर हे आमच्या कार्यालयीन चुकीमुळे पाठविण्यात आले असून सदर पत्र ग्राह्य न धरता त्यावर कोणतीही कारवाई करू नये, हि विनंती, आमच्या कार्यालयाकडून चाकण ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचा धनादेश दिला गेला नाही, असे पत्र पाठविले. या पत्रावर कंपनीचा सही शिक्का नाही. कंपनीने यापूर्वी ग्रामपंचायतला इंग्रजी भाषेतून पत्रव्यवहार केला होता. मात्र 8 जानेवारीचे हे पत्र मराठीतून देण्यात आले होते. या पत्रावर रिलायन्स कंपनीचे सही शिक्के नसल्याने सदरचे पत्र पूर्णतः बनावट व खोटे तयार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ग्रामविकास अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला नाही
दिनांक 25 जानेवारी 2014 रोजी तत्कालीन सरपंच दत्तात्रय किसन बिरदवडे यांनी सरपंच असताना मासिक सभा आयोजित करून सभेचा क्रमांक 10/2914 मधील सभेचा विषय क्रमांक 6 मध्ये रिलायन्स जिओ कंपनीचे पत्रव्यवहाराबाबत व 68 लाख 75 हजार रुपयांच्या खुलाशाबाबत मुद्दा घेण्यात आला. त्यामध्ये रिलायन्स जिओ कंपनीच्या अधिकार्‍यांची पत्रावर सही शिक्का नाही, सदर कंपनी ग्रामपंचायतीची दिशाभूल करीत असून वृत्तपत्रातून गावची व ग्रामपंचायतीची बदनामी झाल्याने सर्वानुमते पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करावा असे ठरविण्यात आले. मागील प्रोसिडिंग मध्ये दुरुस्ती करण्यात यावी व उर्वरित प्रोसिडिंग योग्य व बरोबर मंजूर करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले होते, परंतु यावर अद्याप पर्यंत ठरल्याप्रमाणे ग्रामविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही. तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी रिलायन्स कंपनीकडून चाकण ग्रामपंचायतकरीता एकूण 68 लाख 75 हजार रुपये तत्कालीन उपसरपंच यांनी घेतले, परंतु एक लाख रुपयांचा रोख भरणा दाखवून उर्वरित रक्कम श्री नवनाथ मित्र मंडळ यांच्या नावे चाकण येथील राजगुरूनगर सहकारी बँक व लाला अर्बन बँकेच्या चाकण शाखांमधील खात्यात जमा करण्यात आली. व सदरची रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्या संगनमताने वेगवेगळ्या खात्यांद्वारे काढून घेऊन ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी किशोर शेवकरी यांनी दिलेल्या वरील फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, 464, 467, 468, 471, 474, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.