राष्ट्रवादी पदाधिकार्यांची पत्रपरीषद ; माजी मंत्री खडसेंचा गौरव
भुसावळ– भुसावळच्या शासकीय गोदामातील भ्रष्टाचार बाहेर काढणार्या जि.प.सदस्य पल्लवी सावकारे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भूमिका कौतुकास्पद असून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार लोकप्रतिनिधींच्या लक्षात का आला नाही ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परीषदेत उपस्थित केला. शनिवारी सायंकाळी नवशक्ति आर्केडमधील कार्यालयात पत्रकार परीषद झाली. तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, भुसावळातील वरीष्ठ नेत्यांनी भ्रष्टाचार बोकाळला असतांना दखल का घेतली नाही, याचे आश्चर्य वाटते. तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या कार्यकाळातच सर्वाधिक भ्रष्टाचार बोकाळला, असे त्यांनी सांगितले. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, हिंगे यांच्या काळातच एपीएल व बीपीएलचा बोगस सर्व्हे झाला. त्यामुळेच भ्रष्टाचार घडला व उघडकीस आला. आपण स्वतः नगरसेवक असतांना जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केली होती.