तत्कालीन निरीक्षकांना शिक्षा!

0

धुळे । येथील शहर पोलिस स्टेशनचे बदलून गेलेले पोलिस निरीक्षक डी.आर. कोळी यांनी धुळे येथे कार्यरत असताना आरोपींना साह्यभूत ठरेल असे वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली मात्र त्यांच्या सहानुभूतीच्या विनंती नंतर ‘सक्त ताकीद’ ची शिक्षा कायम करण्यात आली. धुळे पोलिस दलाच्या इतिहासात या प्रकारे निरीक्षक पदावरील वरीष्ठ दर्जाच्या अधिकार्यास अशी खातेअंतर्गत शिक्षा होण्याची पहिलीच वेळ आहे. राजकीय फेकू पुढार्याच्या दबावाखाली येवून कर्तव्यात कसूर करणार्या धुळ्यातील इतर अधिकार्यांना यातून धडा मिळणार आहे. एखाद्या राजकीय दबावाखाली येवून कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांना याप्रकारे वैयक्तिक शिक्षेला सामोरे जावे लागते व त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड ही खराब होते. याचे हे उदाहरण आहे. या प्रकरणातील उर्वरित 8 ते 9 आरोपी महिला व त्यांचा सुत्रधार अद्याप मोकाटच फिरत आहे.

आरटीआय कार्यकर्ते जुनागडे यांचा पाठपुरावा
आरटीआय कार्यकर्ते योगेंद्र जुनागडे यांनी पांझरा नदी काठावरील सुमारे 20 कोटीच्या, उच्चतम पूररेषेतील, पार्किंग-बगिचा आरक्षित जमीनीवरील व्यापारी स्टॉलचे मेघा अतिक्रमण शोधून काढले होते. त्यामुळे मनपा व महसूल प्रशासनाने हे अतिक्रमण काढण्याचे आदेश केले होते. यामुळे चिडून जावून या पुढार्याच्या मार्केट कमिटीमधील शाखेच्या बारा ते तेरा महिलांनी जुनागडे यांच्या घरात घुसून हल्ला केला व रकमा लुटून नेल्या होत्या. याबाबत धुळे शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुनागडे यांच्या निवासस्थानी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असल्याने या हल्लेखोर आरोपी महिला कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाल्या होत्या. या गुन्ह्यात तपासी अंमलदार डी.आर. कोळी यांनी सर्व आरोपी महिलांना न पकडता फक्त चार महिलांना अटक करून कोर्टात दोषारोपपत्र पाठविले. वास्तविक सी.सी.टी.व्ही. फूटेज व चार आरोपी अटक असताना, पूरेसा पुरावा उपलब्ध असताना उर्वरित आठ-नऊ आरोपी पकडणे सहज शक्य होते.

कोळी आढळले कसूरवार
दरम्यान दिपक कोळी यांची बुलढाणा आस्थापनेवर बदली झाली होती. जुनागडे यांच्या पाठपुराव्यानंतर धुळे येथील अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी या प्रकरणी चौकशी केली असता, दिपक कोळी हे कसूरदार आढळून आले. त्यामुळे त्यांचे विरोधात बुलढाणा पोलिस अधीक्षकांकडे कसूरी रिपोर्ट पाठविण्यात आला. त्यानुसार अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. व्ही.एन. जाधव यांनी चौकशी केली. त्यानुसार निष्कर्षात ‘पुराव्यानिशी तक्रार दिली होती तर त्याप्रमाणे तपासी अंमलदार यांनी कारवाई करणे अपेक्षित होते. गुन्ह्याचा सखोल तपास करणे ही जबाबदारी पोलिस निरीक्षक डी.आर. कोळी यांची होती.

शिक्षेविरूद्ध अपिल अनुज्ञेय नाही
कोळी यांना पुढील देय वार्षिक वेतनवाढ (भावी वेतनवाढीवर परिणाम न करणारी) दोन वर्षाकरीता रोखण्याची शिक्षा कां करण्यात येवू नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर दि. 30/11/2016 रोजी दिपक कोळी बाजू मांडण्यास हजर झाले. त्यावेळी पुराव्यानिशी तक्रार असताना सखोल तपास केला असता तर तक्रारीस वाव मिळाला नसता यात आपली चूक आहे हे स्पष्ट करण्यात आले. त्यावर दिपक कोळी यांनी केलेला खूलासा व सहानुभूती पूर्वक विचार करता भविष्यात वरील चूकीची पुनरावृत्ती होवू नये यासाठी पुढील दोन वर्षाची वार्षिक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेत अंशतः बदल करून त्याऐवजी ‘सक्त ताकीद’ ही शिक्षा देत आहे, सदर शिक्षेविरूद्ध अपिल अनुज्ञेय नाही, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. व्ही.एन. जाधव यांनी आदेशात म्हटले आहे.