मुंबई । फेसबुक हे आभासी जग असले तरी या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य होऊ शकते हे फेसबुकवरील कुबेर या समूहाने एका सदस्याला अचानक आलेल्या आजाराच्या संकटात 2 दिवसांत 3 लाख रुपये मदत करून दाखवून दिले आहे. संतोष लहामगे यांनी तयार केलेल्या कुबेर नावाच्या समूहाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल तीन लाखांची मदत गोळा करून समूहातील जयेश नलावडे या सदस्याचा उपचाराकरिता तातडीने दिली आहे.
आतापर्यंत आपल्या वाचण्यात आणि पाहण्यात सोशल मीडियाचा वापर शक्यतो अपप्रचार किंवा अशांतता पसरवण्यासाठी केला जातो असंच आलेले आहे. परंतु, याच गोष्टींना पुसून टाकत कुबेर समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांनी या सोशल मीडियाचं महत्त्व पटवून दिलं आहे. काही दिवसांपूर्वी जयेश नलावडे हा अचानक आजारी पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा आजार इतका वाढला की, त्याला अतिदक्षता विभागात केलं गेलं. जयेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याची माहिती समूहचालक संतोष लहामगे यांना लागली. त्यांनी जयेशला मदत करण्याचं आवाहन समूहातील सर्व सदस्यांना केलं. त्यानंतर लगेचच समूह सदस्यांनी मदतीचा मानस ठेवत अगदी दोन दिवसांत 3 लाख रुपये मदतनिधी म्हणून गोळा केला.
सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक
या कुबेर समूहामध्ये जवळपास दहा देशात विविध क्षेत्रांत काम करणारी एकूण 1700 सदस्य असून, ते नेहमी सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात. यापूर्वीही अनेकांच्या मदतीला कुबेरकर धावून आलेले आहेत. त्यासोबत हा महाराष्ट्रातील असा फेसबुक समूह आहे ज्याचे आत्तापर्यंत सहा संमेलन पार पाडली आहेत. जलसंधारण कामात एक गाव दत्तक, फिरते वाचनालय, हेल्पलाइन, कलाकारांना व्यासपीठ, प्रकाशन संस्था, दिवाळी अंक असे अनेक उपक्रम राबवणार्या या ग्रुपने शाळा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी समूहाचे प्रमुख संतोष लहामगे यांनी जयेशच्या आईकडे पैसे सुपूर्द केले. कुबेर समूहाचे आणि त्यांच्या अशा सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.