मुंबई । एका सामन्यात 1000 पेक्षा जास्त धावा कुणी करेल, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण दोन वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने एका डावात 1009 धावांची खेळी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्याचा हा विश्वविक्रम बापजन्मात कुणी मोडणार नाही, असेच वाटले होते. पण अवघ्या दोन वर्षांमध्येच प्रणव धनावडेचा हा विक्रम मोडीत काढण्याचे काम नवी मुंबईच्या तनिष्क गवतेने केले आहे. मंगळवारी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील यशवंतराव चव्हाण (इंग्रजी माध्यम) शाळेच्या तनिष्क गवतेने 1045 धावांची खेळी करत प्रणवचा हा विक्रम मोडीत काढला आहे. नवी मुंबई शील्ड आंतरशालेय 14 वर्षांखालील स्पर्धेत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
तनिष्कचेे 149 चौकार आणि 67 षटकार
या स्पर्धेला मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे प्रणव धनावडेचा विक्रम कायम राहणार, हे जवळपास निश्चित आहे. यशवंतराव चव्हाण इंग्रजी शाळेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी यशवंतराव चव्हाण संघाविरुद्ध खेळताना तनिष्क गवतेने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची चुणूक दाखवली. पहिल्या दिवशी 407 धावांवर राहिलेल्या तनिष्कने दुसर्या दिवशीही धावांचा रतीब लावला. दुसर्या दिवशी 638 धावांची खेळी करून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. 515 चेंडूंचा सामना करत तनिष्कने 149 चौकार आणि 67 षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या धुंवाधार खेळीमुळे यशवंतराव चव्हाण इंग्रजी शाळेने 3 बाद 1324 धावांचा डोंगर उभारला. यशवंतराव चव्हाण शाळेचा डाव मात्र अवघ्या 63 धावांत आटोपला. हा सामनालेग साईडची सीमा रेषा 60 ते 65 यार्ड आणि ऑफ साईडची सिमा रेषा 50 यार्ड असलेल्या मैदानात खेळवण्यात आला होता.
मान्यतेचा घोळ
या स्पर्धेच्या मान्यतेसाठी आम्ही मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात गेलो होतो. पण नोंदणी प्रक्रियेला दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने तुम्ही स्पर्धा सुरू करा, आम्ही मान्यते संदर्भातील प्रक्रिया सुरू करू, असे एमसीएकडून सांगण्यात आले. माजी कसोटीपटू गुलाम पारकर आणि माजी रणजीपटू झुल्फिकार पारकर यांच्यासह आम्ही या स्पर्धेच्या मान्यतेसाठी एमसीएकडे दाद मागणार असल्याचे यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम शाळेचे प्रशिक्षक मनिष यांनी सांगितले.