तपासणीच्या धास्तीने बाहेरून धान्य आणून भरल्या गोण्या!

0

कुऱ्हा, मुक्ताईनगरच्या गोदामातील प्रकार; खडबडून जागा झाला पुरवठा विभाग

मुंबई :- अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या धान्य गोदामांमध्ये कशाप्रकारे रेशनच्या धान्यमालाची अफरातफर केली जाते, याचे पितळ माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनीच उघड केल्यांनतर शासनाचा पुरवठा विभाग खडबडून जागा झाला आहे. खडसे यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या दक्षता पथकाने जिल्ह्यात तपासणी सुरु केली. या तपासणीच्या धास्तीने बाहेरून धान्य आणून गोदामातील गोण्यांमध्ये भरले जात असल्याचा प्रकार कुऱ्हा, मुक्ताईनगर येथे समोर आला आहे. याची माहिती खुद्द आमदार एकनाथराव खडसे यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.

खडसे यांच्या तक्रारीनंतर मुंबईहून आलेल्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जिल्ह्यातील ८ तालुक्यातील गोदामे सील करून तिथले दफ्तर ताब्यात घेतले आहे. १५ अधिकाऱ्यांच्या या दक्षता समितीद्वारे जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमधील शासकीय गोदामांची तपासणी सुरु असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये शासकीय गोदामात धान्य वितरण करताना प्रती ५० किलोग्राम धान्याच्या गोणीमागे १० ते १२ किलो धान्य चोरी होत असल्याचे समोर आले होते. दरम्यान खडसे यांच्या तक्रारीची गंभीर दाखल घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी पुरवठा विभागाचे राज्यस्तरीय दक्षता पथक जळगाव जिल्ह्यात पाठविले आहे.

१५ अधिकाऱ्यांचे या पथकाने रविवारी एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव तालुक्यातील शासकीय गोदामांची तपासणी करून ही चारही गोदामे सील केली व त्या गोदामांचे दफ्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. सोमवारी या पथकाने धरणगाव, बोदवड, अमळनेर व पाचोऱ्यातील शासकीय गोदामांना सील करून दफ्तर ताब्यात घेतले आहे. उर्वरित तालुक्यातील शासकीय गोदामांची देखील या पथकाकडून तपासणी सुरु असून मंगळावर पर्यंत सर्व तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या दफ्तराची पूर्ण चौकशी केल्यांनतर टप्प्याटप्प्याने दोषींवर कारवाई केली जाईल असे विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी भुसावळ, चाळीसगाव व अमळनेर परिसरातून रेशन मालाचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शुक्रवारी खुद्द खडसे यांनी भुसावळ तालुक्यातील गोदामात भेट देऊन केल्यांनतर राज्यस्तरीय दक्षता समिती जळगाव जिल्ह्यात गेली असून या समितीने धाडसत्र सुरु केले आहे. दरम्यान, कारवाई योग्य रीतीने चालू असून एका बाजूला सुरु असताना दुसरीकडे गोदामांमध्ये बाहेरून धान्य आणून कमी धान्य असलेल्या गोण्यांमध्ये भरले जात असल्याचे खडसे यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले. दरम्यान स्थानिक अधिकारी, पुरवठादार यांचे साटेलोटे असून रेशनमालाच्या काळ्या बाजाराची प्रकरणे अधिकारी दाबून टाकत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याची मागणीही खडसे यांनी केली आहे.