तप्त उन्हात अनवाणी फिरणार्‍या गरीब मुलांना पादत्राणे वाटप

0

शिरपूर। स गळीकडे उन्हाची काहिली वाढली आहे. उन्हाच्या चटक्यांनी दिवसा घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. परिस्थिती नसल्याने अशा उन्हात देखील काही निराधार, गरीब लोकांना अनवाणी पायाने फिरावे लागते. मे महिना म्हटल्यावर कडाक्याच्या उन्हाचे चटके लागत असल्याचे दृश्य पाहून येथील भारतीय जैन संघटनेचे सचिव राजेंद्र पारख यांनी तीनशे ते साडे तीनशे अनवाणी फिरणार्‍या मुलांना पादत्राणे वाटप केली.

उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक
शनिमंदिर परिसरातले मुल अनवाणी भरकटत असल्याचे पाहून पारख यांनी विशाल बागरेचा, योगेश संचेती, संदीप मुनोत, आतिश शेठीया यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली असता सर्वांनी एकत्रित येत पादत्राणे देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमानंतर कधीच चपलेचा वापर न केलेल्या या गरीब मुलांना पादत्राणाचे कमालीचे कुतूहल वाटत होते. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वर्षी गावात कष्टकरी वर्ग राहतो. सकाळी उठल्यावर मजूरी व हमालीसाठी कामाला जाणारा हा वर्ग. मिळालेल्या पैशातून कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह भागवतात. गरिबीमुळे मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष राहत असल्याने शालेय साहित्य आणणे कठीण असताना अशा मुलांना पादत्राणे कुठून आणणार? असा कठीण प्रश्न कुटुंबातील प्रमुखापुढे असतो. या परिसरातील बरीचशी मुले अनवाणी फिरताना दिसतात. हे असे दृश्य पाहून पारख यांनी पादत्राणे वाटप करण्याचा निर्णय घेतला.

हीच खरी पुण्याई
शनिजयंतीच्या चांगल्या दिवशी शनिमंदिर परिसरात जाऊन पादत्राणे वाटप करण्यात आले. हीच खरी पुण्याई असल्याचे पारख यांनी सांगितले. गरीब वसाहतीतील मुलांना दिशा देण्याची गरज असल्याचे पारख म्हणाले. गरीब मुलांकडे प्रशासनाने लक्ष पुरविले तर ही गरीब मुले उद्याची पिढी घडवतील असा विश्वास पारख यांनी व्यक्त केला. पारख यांच्या या उपक्रमाबद्दल बळसाणे येथील गणेश जैन, दिलीप जैन, राजेंद्र पारख, सचिन बोरा, शांती कोठारी, राहुल कोचर, निशांत पारख, रोनक कोच, शांती कोठारी, राजेंद्र पारख, गणेश कोचर, सचिन बोरा, राहुल कोचर, निशाण पारख, रोनक कोचर यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.