वरणगाव । येथून जवळच असलेल्या सावतर-निंभोरा येथील सार्वजनिक विहीरीवरील पाणी पुरवठा करणारा विजेचा पंप जळाल्याने गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कडा तुटलेल्या विहीरीतून पाणी काढताना महिलांना आपला जीव मुठीत ठेवून पाणी काढावे लागत आहे. तर ऐन उन्हाळ्यात गुरांना पाणी पाजण्यासाठी पशुधन मालकांना तापी नदी पर्यंत गुरांना घेवून पाणी पाजण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सावतर – निंभोरा, हतनुर तीन गावे मिळून हतनूर गृप ग्रामपंचायत आहे. या गावांच्या बाजुला हाकेच्या अंतरावर तापी नदी आहे. मात्र पाण्यापासून सदरचे गावे वंचीत आहेत. तीन्ही गावाना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मालीकीची विहिर आहे. या विहिरीवरून सावतर व निंभोरा या गावाना पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही गावात अंदाजे दोनशे कुटुंबे वास्तव्याला असुन अठऱाशे पर्यंत लोकसंख्या आहे.
पशुपालकांचीही पायपीट
या गावांना पाणीपुवरठा करणार्या विहीरीतील विजेची मोटार जळाल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. तर नदीवरील विहीरीतील मोटार कमी अश्वश्क्तीची असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे दोन्ही गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील मुले स्त्रीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शेजारच्या शेतातून अथवा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहीरीतून पाणी ओढावे लागत असल्याने जीवीतास धोका नर्माण झाला आहे. तर गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीपर्यंत पायपीट पशुपालकांना करावी लागत आहे.
पाण्याचे स्त्रोतही आटले
दरम्यान विजपंप जळाल्यामुळे गावातील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. यासाठी नागरिकांना पाणी पुरवठ्याचे पर्यायी साधन नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील बहुतांश विहीरींनी देखील तळ गाठला असल्यामुळे जवळपास पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही नागरिक शेती परिसरात जाऊन डोक्यावर तसेच बैलगाडीतून पाणी आणत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पाण्याची मोटार दुरुस्ती करुन ग्रामस्थांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
येथील गावातील मोटार जळाली आहे. या विहीरीसाठी नविन विज मोटार घेण्याचे नियोजन सुरू आहे. तोपर्यंत नदीवरील विहिरीतून पाणीपुरवठा सुरू आहे. या ठिकाणी आठ तास विजपुरवठा असल्याने अडचणी येत आहेत. परंतु लवकरच हा प्रश्म मार्गी लावून पाणीपुवरटा सुरळीत केला जाईल.
– निता इंगळे, सरपंच, हतनुर गृप ग्रामपंचायत