शिंदखेडा। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंगाची लाहीलाही करणार्या उन्हामध्ये अनेकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. अशा उन्हात गार पाणी पिण्यासाठी मिळाले तर ती एक पर्वणीच. अशा उन्हाळ्याच्या दिवसात केवळ दिखावा म्हणून पाणपोई सुरु करून लगेच बंद करणारी अनेक उदाहरणे असताना शिंदखेडा शहरात स्टेशनरोड भागात देसले कुटुंबियांकडून गेल्या तीन वर्षांपासून ही सेवा येणा-जाणार्या पादचार्यांसाठी अविरतपणे सुरु आहे.
स्वखर्चाने उपक्रम : शहरातील शिवाजी चौफुली ते भगवा चौक हा परिसर स्टेशन रोड म्हणून प्रसिध्द आहे. या परीसरात कै.कालिदास देसले यांच्या मालकीचे पाटील फर्निचर नावाचे दुकान आहे. आता त्यांचा मुलगा प्रशांत देसले हा दुकानाचा कारभार पाहतो. त्यांनी नागरिकांना पाणी पिता यावे यासाठी शंभर लिटर थंड पाणी मावेल एवढ्या क्षमतेची टाकी लावली आहे. या टाकीला हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांशी जोडले आहे. अतिशय शुद्ध आणि थंडगार पाण्यासाठीच्या या युनिटला एकूण खर्च पन्नास हजार रूपये आला आहे. दिवसाला आठशे ते हजार लिटर थंड पाणी लागते.
सेवा कायमस्वरूपी : सद्य:स्थितीत नगर पंचायतीच्या घेतलेल्या नळाचे पाणी उपलब्ध होते. काही वेळा पाणी नसले तर टँकर आणून वरच्या टाक्या भरून या सेवेत खंड पडू दिला जात नाही. आमचे वडिल कै.कालीदास देसले ह्यांनी सुरू केलेली सेवा कायम स्वरूपी सुरूच राहील. यासाठी कोणाकडूनही निधी घेतला जात नाही. तहानलेल्यांला पाणी देण्यासारखे दुसरे पुण्य नाही हे वडिलांचे वाक्य आम्हा मुलांच्या लक्षात आहे. आजपर्यंत अनेक पादचा-यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांची तृष्णा पूर्ण होते यातच आमचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत देसले यांनी ’जनशक्ति’शी बोलतांना दिली.
नागरिकांची वर्दळ अधिक
या परिसरात शहराची मुख्य बाजार पेठ, भाजी मार्केट, शाळा, बसस्थानक असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. या भागात पिण्यासाठी पाण्याची बारमाही वानवाच असते. पाण्याची टंचाई असल्याने हॉटेलधारकांकडून चहा घेतला तरच पाणी मिळेल अशी अट घातली जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पादचा-यांना वणवण करावी लागत असे. पादचा-यांची ही अडचण लक्षात घेवून कै.कालिदास देसले यांनी हयात असतांना कायम स्वरूपी थंडगार पाण्याची व्यवस्था केली. आज तागायत दिवसरात्र ही पाणपोई सुरू आहे.