तबला वादक पंडित आजाद यांच्याकडून नादाची अविरतपणे उपासना

0

चिंचवड : भारतातील सर्व धर्म वेगवेगळ्या रितीरीवाजाचे पालन करीत असले, तरी सर्व धर्मांना नादाची उपासना मान्य आहे. या नादशैलीची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पंडित अरविंदकुमार आजाद यांनी पुणेकरांसाठी सुरू ठेवली आहे, असे मत संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज पैठणकर (गोसावी) यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवडमधील साधना म्युझिक सर्कलच्या वतीने आंतरराष्ट्रीय तबला वादक पंडित अरविंदकुमार आजाद आणि गुरुवर्य पंडित रामकृष्ण कोरडे यांच्या गुरुपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेवक संतोष लोंढे, सुरेश भोईर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, संस्थेचे अध्यक्ष किशोर कोरडे, अनुपमा आजाद, दुर्गा कोरडे, ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण, ह.भ.प. पांडुरंग आप्पा दातार, ह.भ.प. सुखलाल महाराज बुचडे, ह.भ.प. उद्धव महाराज गायकवाड आदी उपस्थित होते.

पखवाज वादनाने मानवंदना
ह.भ.प. पैठणकर म्हणाले की, पंडित आजाद यांनी आतापर्यंत शेकडो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायकांना तबल्याची साथ दिली. तसेच, हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले. तबला वादक मोठ्या गायकाबरोबर संधी मिळावी, म्हणून प्रयत्न करीत असतात. मात्र, पंडित आजाद यांची तबल्याची साथ मिळावी, म्हणून अनेक ज्येष्ठ कलाकार प्रयत्न करीत आहेत, असे दिसते. पंडित आजाद यांचे संगीत क्षेत्रात खूप मोठे नाव असूनही त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आळंदीतील 101 वारकरी विद्यार्थ्यांनी पखवाज वादन सादर करून पंडित आजाद यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गायकवाड, सूत्रसंचालन आनंद देशमुख तर आभार संस्थेचे अध्यक्ष किशोर कोरडे यांनी मानले.