पुणे: तबलिगी जमातीमुळे भारतात करोना विषाणूचा फैलाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे धार्मिक तेढ वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुस्लिम समाजातही तबलिगींच्या वर्तनाबद्दल असंतोष आहे. त्यामुळे तबलिगी जमातीने सर्व भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली आहे. मंडळाने एक पत्रक काढून तबलिगी जमातवर जोरदार टीका देखील केली आहे.
दिल्लीतील निजामुद्दीने इथे भरवण्यात आलेल्या मरकजकीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील शिक्कामोर्तब केले आहे. याचे पडसाद सोशल मीडियातही उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल व करोनाच्या फैलावाला कारण ठरल्याबद्दल तबलिगींनी माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहे. येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मशिदीत नमाज आदा करतात आणि कब्रस्थानात जाऊन प्रार्थना करतात. काही दिवसांनी रमजान महिनाही सुरू होतोय. त्यावेळी महिनाभर उपास, नमाज, कुराण पठण केले जाते. सामुदायिक नमाज, गळाभेटी होतात. हे सर्व करोनाच्या फैलावास कारणीभूत होऊ शकते. त्यामुळे सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादित ठेवाव्यात. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करून सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मंडळाने केले आहे.