तब्बल सात अक्कलदाढांनी केले होते बेजार

0

नंदुरबार । माणूस वयात आला म्हणजे त्याला अक्कलदाढ येते हा निसर्गाचा नियम आहे. मात्र किती अक्कलदाढ याव्यात यालाही मर्यादा आहेत. साधारणतः माणसाला चार अक्कलदाढ उगवतात. काहिंना दोन तर काहींना एकच दाढ उगवते काहींना तर मरेपर्यंत ही दाढ उगवतच नाही. परंतु लाखातून एखादा व्यक्ती त्याला अपवाद असतो. असाच एक अपवाद नुकताच नंदूरबारात पाहायला मिळाला. एका व्यक्तीला तब्बल सात अक्कलदाढ उगवल्या. अर्थात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे व डॉक्टरांच्या हुशारीने त्यातील अनावश्यक दाढी काढून त्यास त्रासमुक्त करण्यात आले.

लाखातून आढळतो रूग्ण !
नंदुरबार शहरातील गणेश ग्लास हाऊसचे मालक व श्रीजी पार्क येथील रहिवासी कैलास देविदास मराठे यांना दातांचा त्रास होत असल्याने त्यांनी शहरातील डॉ. घनश्याम पाटील यांच्या निलेश डेंटल क्लीनिक मध्ये तपासणी केली. त्यावेळी जबड्याचा एक्सरे काढल्यानंतर लक्षात आले की, रुग्णाच्या जबड्यात वरच्या बाजूला तब्बल पाच अतिरिक्त दाढ उगवल्या आहेत. अशा परिस्थितीत अतिरिक्त दाढी काढून टाकणे आवश्यक असल्याने, डॉ. घनश्याम पाटील यांनी तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून रुग्णाला वेदनामुक्त केले. अशा प्रकारचा रुग्ण लाखातून एखाद दुसरा असतो व अशा शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व जिकिरीच्या असतात, असे नुकत्याच झालेल्या या शास्क्रियेबाबत डॉ घनश्याम पाटील यांनी सांगितले.