नवी दिल्ली । आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत देदीप्यमान विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने चारवेळा हा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय बहाद्दराच्या या पराक्रमामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र एवढ्यापुरताच हा विजय मर्यादित नाही, तर या विजयाबरोबरच भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाच्या संघाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचा हिशेबही चुकता केला आहे. त्याने तब्बल 11 वर्षांनंतर चॅपल यांच्याकडून एका अपमानाचा बदला घेतला आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान राहुल द्रविड, ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुली ही तिकडी फार दिवसानंतर सोबत पाहायला मिळाली. भारतीय संघाचा प्रशिक्षक द्रविड, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि समालोचन करण्यासाठी सौरव गांगुली मैदानात होते. बीसीसीआयने 2006 मध्ये, सौरव गांगुलीच्या सांगण्यावरुनच ग्रेग चॅपल यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.
मात्र या दोघांमध्ये थोड्याच दिवसांत मतभेद निर्माण झाले आणि चॅपल यांनी दादाला संघातून बाहेर काढले. यानंतर चॅपल यांच्याच सांगण्यावरुन बीसीसीआयने राहुल द्रविडला भारतीय संघाची कमान सोपवली. याचदरम्यानच गांगुली आणि द्रविड यांच्यात मतभेद असल्याची चर्चाही कानावर येत होती. गांगुलीला संघातून काढल्यानंतर आणि द्रविडच्या हाती संघाची धुरा दिल्यानंतरही चॅपल यांची संघातील दादागिरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. एवढी, की गांगुलीनंतर सचिन, सेहवाग आणि हरभजनदेखील चॅपलच्या विरोधात गेले होते. चॅपल भारतीय संघाचे प्रशिक्षक असतानाच 2007 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये विश्वचषक स्पर्धा पार पडली. त्यावेळी चॅपल यांनी भारतीय संघात काही बदलही केले होते. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला बांग्लादेशसारख्या संघाकडून हार पत्करुन पहिल्याच फेरीतून मायदेशी परतावे लागले होते. या पराभवाला कारणीभूत होती, ती चॅपल यांची संघातील मगरुरी आणि हेकट स्वभाव. तेव्हा भारताचे पहिल्या फेरीत बाद होणे संपूर्ण भारतीयांच्या जिव्हारी लागले होते. सर्वांच्याच मनात प्रशिक्षक चॅपल यांच्याविषयी संताप निर्माण झाला होता.