जनार्दन पवळे संघ, तांबट आळी, कसबा पेठ मंडळाचे 76 वे वर्ष
पुणे : आखीव-रेखीव शिल्पे आणि विविधरंगी विद्युतरोषणाईने सजलेल्या बाहुबली रथाची तब्बल 25 फुटी प्रतिकृती कसबा पेठ तांबट आळी माणिक चौकातील जर्नादन पवळे संघाने उभारली आहे. मंडळाच्या 76व्या वर्षानिमित्त हा वैशिष्टयपूर्ण देखावा साकारण्यात आला असून हा रथ ओढताना गणेशभक्तांना सेल्फी काढता यावा, याकरीता सेल्फी पॉइंटची विशेष सोय करण्यात आली आहे.
देखाव्याचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष महेश खरवलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्याध्यक्ष राकेश डाखवे, उपाध्यक्ष सुशांत कर्डे, बाप्पूसाहेब भेगडे, नितीन शितोळे, मोहन पोकळे, दिनेश डाखवे, योगेश समेळ, मार्गदर्शक दीपक मानकर यांसह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शक सिद्धार्थ तातुसकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे.
बाहुबली रथाच्या प्रतिकृतीची उंची 25 फूट असून लाकडी फळ्या, प्लायवूड, थर्माकोल, फेव्हिकोल आणि विविधरंगांचा वापर देखाव्याकरीता करण्यात आला आहे. याशिवाय बाहुबली चित्रपटातील हत्तीची प्रतिकृती देखील गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. बाहुबली रथ हा चारही बाजूंनी एकसारखाच दिसेल, अशा 4डी प्रकारात करण्यात आला आहे. त्यावर गणरायाची मूर्ती विराजमान झाली असून चांदीची विविध प्रकारची आभूषणे कसब्याच्या राजाच्या मूर्तीची शोभा वाढवित आहे. प्रतिकृतीवर लावण्यात आलेले रंगीबेरंगी लाईट्स हे देखाव्याचे खास वैशिष्ट्य आहे.