A Jalgaon policeman who danced to the beat of a drum during a pageant was suspended जळगाव : जिल्हा पोलिस दलातील अधिकार्यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून वाद ओढवून घेतला असताना आता याच दलातील एका पोलिस कर्मचार्याला तमाशाच्या फडात नाचणे चांगलेच महागात पडले आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरला होताच सहायक फौजदार भटू वरभान नेरकर यास पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले. दरम्यान, जळगाव तालुका पोलिस ठाण्याचा आणखी एक कर्मचार्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तमाशाच्या फडातील व्हिडिओ व्हायरल
गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा.आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (32, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (22, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याने गावात तमाशाचे आयोजन केले. तेथे पोलिस कर्मचारी भटू नेरकरसह एका अन्य कर्मचार्याने हजेरी लावली. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यामुळे नेरकरला निलंबित करण्यात आले तर दुसर्याचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे? त्याची चौकशी सुरु असून तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.