तरंगवाडीत अवैध धंदे फोफावले

0

इंदापूर । इंदापूर तालुक्यातील मौजे तरंगवाडी गावातील जुगार अड्ड्यांवर इंदापूर पोलिसांनी पंधरा दिवसात दुसर्‍यांदा छापा टाकून रोख रक्कम व किरकोळ मुद्देमालासह सहा जनावरे जप्त करण्यात आली आहेत. वारंवार कारवाई करूनही अवैध धंदे सुरूच आहेत. बेकायदा दारू विक्री व जुगार्‍यांचे ते माहेर घर बनले असल्याची चर्चा सुरू आहे.

शांतता कमिटीची बैठक
या दोन-तीन महिन्यात इंदापूर तालुक्यात साजर्‍या करण्यात येणार्‍या महापुरुषांच्या जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्त तालुक्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी पुणे जिल्हा ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक संदीप पखाले, बारामती पोलिस उपविभागीय अधिकारी बापुसाहेब बांगर व तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सव काळात नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक संदीप पखाले यांनी इंदापूर येथे केले होते. परंतु 4 ते 18 फेबु्रवारी या पंधरा दिवसात मौजे तरंगवाडीत जुगार खेळणार्‍या अड्ड्यावर इंदापूर पोलिसांनी दोन वेळा छापा टाकला. या थातूर मातूर कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
तरंगवाडी गावात अवैध दारू विक्रीबरोबरच बेकायदेशीर जुगार अड्ड्यांचेही पेव फुटल्याने 4 फेब्रुवारीला पोलिसांनी जुुगार अड्ड्यावर छापा मारून 10 जणांवर कारवाई केली होती. यात इंदापुरातील काँग्रेसच्या एका माजी नगराध्यक्षांच्या पतीराजांसह अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता. सुरुवातीला हे प्रकरण काही सामाजिक व राजकीय तथाकथित पुढार्‍यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही दक्ष सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे पोलिसांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे भाग पडले. परंतु लाखाच्या पटीत जप्त मुद्देमाल सापडल्याची चर्चा असताना केवळ 27,900 एवढीच रक्कम कागदोपत्री जप्त दाखविण्यात आल्याने इथेही कारवाईबाबत अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

महिलांची आयुक्तांकडे धाव
अवैध देशी दारू विक्रेत्यांविरोधात या गावातील महिलांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून दारु बंदी करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यासाठी महिलांनी आंदोलनाचा पवित्राही घेतला होता. इंदापूर पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत करत असल्याने महिलांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. न्याय मिळविण्यासाठी या महीलांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाचे उंबरठे झीजवावे लागले.

ती रक्कम गेली कुठे?
काही दिवसांपूर्वी येथील 11 लाखांच्या गुटख्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर रंगली होती. परंतु त्या गुटखा प्रकरणाचा तपास गुलदस्त्यातच राहीला असल्याने इंदापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे का? हा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 2 च्या सुमारास पोलिसांनी हॉटेल निळकंठच्या शेजारील मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. जुगार खेळनार्‍या सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 1600 रुपये, त्या ठिकाणी असणार्‍या पाच खुर्च्या, पत्ते अशी 4 हजार 600 रुपयांची रक्कम व मुद्देमाल जप्त करून जुगार अड्ड्याचा मालक रवी माने, दगडु वाघमोडे, नामदेव पवार, अशोक पवार, जनार्दन द्रिजोंरे, ज्ञानेश्‍वर जाधव यांच्यावर गुन्हे दाख करण्यात आले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्याची चर्चा आहे. परंतु किरकोळ रक्कम जप्त झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने जागेवरून ताब्यात घेण्यात आलेले मोठी रक्कम गेली कुठे? याचीच चर्चा सध्या गावभर रंगली आहे. अनेक ठिकाणी अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याने पोलिसांचा वचक राहीला नसल्याचे स्पष्ट होत आहे.