…तरच खरा न्याय मिळेल!

0

अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डीत शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मारेकर्‍यांच्या या क्रौर्यामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. अनेक शहरांतून मूक मोर्चे निघाले होते. याचा सरकारवर नैतिक दबाव आल्याने हा खटला वेगाने चालवण्याचे प्रयत्न झाले. हा खटला आव्हानात्मक होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुरावा गोळा करून तो सिद्ध करण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर होती. त्यांनी ती यशस्वीपणे पेलली. जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलूमे या तिन्ही आरोपींविरोधात पुरावे त्यांनी न्यायालयात सिद्ध केले.

दुर्दैवी मुलीच्या अंगावरील जखमा, आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने यांबाबतचे पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. या क्रूरकर्म्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने न्यायदानाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. शिक्षा जाहीर होऊन ती प्रत्यक्षात येणे हा पुढचा टप्पा असून, तोही वेगाने पूर्ण झाल्यास कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळेल. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.कितीही कडक शिक्षा आरोपींना होऊ लागल्या तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतरही देशभर क्षोभ निर्माण झाला होता. त्यानंतरच महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी फाशीच्या शिक्षेचा मोठ्या प्रमाणावर आग्रह धरण्यात येऊ लागला. निर्भया प्रकरणाचा खटला वेगाने निकालात काढून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. याच प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराचा विषय देशभर चर्चिला गेला. हे अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचारमंथन झाले. कठोर कायदे करण्यापासून खटले वेगाने चालवण्यापर्यंतच्या सूचना आल्या. कोपर्डीनंतरही महाराष्ट्रात अशाच प्रकारची चर्चा झाली. अशा प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवून गुन्हा नोंदविण्यापासून वेगवान न्यायदान होण्याबाबत सर्वसहमती झाली. त्यामुळे असे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जात आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ नुसत्या उपाययोजना आणून चालणार नाहीत, तर त्यांची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. महिला आणि मुली यांना सुरक्षेचे वातावरण निर्माण करून त्या दिशेनेही पाऊले उचलण्याची आज गरज आहे. तसे झाले तरच खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.

वाड्या-वस्त्यांवर शाळा नसल्याने राज्यातील हजारो मुली आजही मैलोन्मैल पायी जातात. त्यातीलच एकीवर कोपर्डीत बलात्कार झाला होता. मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार होणेही आवश्यक आहे. तसे झाले तरच कोपर्डीतील पीडितेला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.

-भक्ती पांढरा शानभाग, पुणे